महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजूनही म्हाडाची सुमारे 400 ओसी मिळालेली घरे पालिकेच्या ताब्यात, पात्र विजेते नाराज - BMC latest news

या घरांच्या पात्रता-निश्चिती आणि घराचा ताबा देण्याची प्रक्रिया मुंबई मंडळाकडून ऑनलाइन सुरू होती. ही प्रक्रिया पूर्ण करत पात्र विजेत्यांनी घराची रक्कम भरली. त्यांचे गृहकर्जाचे हप्तेही सुरू झाले. पण घरे काही अजून मिळत नाहीत. काही विजेते तर सध्या राहत असलेल्या भाड्याच्या घराचे पैसे भरत आहेत तर दुसरीकडे त्यांचे कर्जाचे हप्तेही सुरू झाले आहेत. त्यामुळे असे विजेते मोठ्या आर्थिक संकटात अडकले आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर घराचा ताबा द्यावा, यासाठी या विजेत्यांनी मंडळाकडे तगादा लावला आहे.

म्हाडाची घरे पालिकेच्या ताब्यात
म्हाडाची घरे पालिकेच्या ताब्यात

By

Published : Sep 29, 2020, 2:58 PM IST

मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाची सुमारे 900 ओसी मिळालेली सोडतीतील घरे मुंबई महानगर पालिकेने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइनसाठी घेतली आहेत. यापैकी आता सुमारे 500 घरे म्हाडाला आता परत मिळाली आहेत. तर अजूनही अंदाजे 400 घरे पालिकेकडेच आहेत. या सर्व घरांचा ताबा पात्र विजेत्यांना देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांचा घराचा हप्ताही सुरू झाला आहे. पण ही घरेच मिळत नसल्याने विजते नाराज असून त्यांनी मात्र आता घरांचा ताबा देण्याचा तगादा लावला आहे. या तगाद्यामुळे मुंबई मंडळाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता मुंबई मंडळाने ही पालिकेकडे ही घरे परत देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची आणि संशयित रुग्णांची संख्या एप्रिलमध्ये वाढली. त्यामुळे पालिकेला मोठ्या संख्येने क्वारंटाइनसाठी जागा लागणार होती. त्यानुसार पालिकेने शाळा, महाविद्यालये, समाज मंदिर, हॉल याबरोबरच रिकामी घरेही ताब्यात घेण्यास सुरुवात केली. साथरोग नियंत्रण कायद्याखाली पालिकेला हे विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. या अधिकाराखाली मुंबई मंडळाची लॉटरीतील ओसी मिळालेली 900 घरे पालिकेने ताब्यात घेतली. या घरामध्ये कोरोना रुग्णांना-संशयित रुग्णांना क्वारंटाइन करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा -कंगना प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेवर ताशेरे

दरम्यान या घरांच्या पात्रता-निश्चिती आणि घराचा ताबा देण्याची प्रक्रिया मुंबई मंडळाकडून ऑनलाइन सुरू होती. ही प्रक्रिया पूर्ण करत पात्र विजेत्यांनी घराची रक्कम भरली. त्यांचे गृहकर्जाचे हप्तेही सुरू झाले. पण घरे काही अजून मिळत नाहीत. काही विजेते तर सध्या राहत असलेल्या भाड्याच्या घराचे पैसे भरत आहेत तर दुसरीकडे त्यांचे कर्जाचे हप्तेही सुरू झाले आहेत. त्यामुळे असे विजेते मोठ्या आर्थिक संकटात अडकले आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर घराचा ताबा द्यावा, यासाठी या विजेत्यांनी मंडळाकडे तगादा लावला आहे. त्यानुसार मंडळाने पालिकेकडे ही घरे परत मागितली आहेत.

मंडळाच्या मागणीनुसार आतापर्यंत पालिकेने 900 पैकी सुमारे 500 घरे परत केली असल्याची माहिती मुंबई मंडळाच्या पणन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तर उर्वरित 400 घरे लवकर मिळावीत, यासाठी ही चर्चा सुरू असल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे. ही घरे लवकर मिळाली नाहीत तर, विजेत्यांची नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान एका ठिकाण चार इमारती पालिकेने घेतल्या होत्या. त्यातील 3 इमारती परत केल्या आहेत. मात्र एक इमारत अजूनही पालिकेकडे असून यात रुग्ण आहेत. ही इमारत अगदी मधोमध असल्यामुळे ज्या 3 इमारती परत मिळाल्या आहेत, त्यांचाही ताबा मुंबई मंडळाला देता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता सर्व घरे रिकामी करत, सॅनिटाईज करत परत द्यावी, यासाठी मुंबई मंडळ पालिकेशी चर्चा करत आहे. तेव्हा पालिका ही घरे कधी देते आणि सर्व विजेत्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न कधी पूर्ण होणार हेच पाहणे आता महत्त्वाचे आहे.

हेही वाचा -आता सुरक्षितपणे खा पाणीपुरी; औरंगाबादेत सुरू झालंय 'पाणीपुरीचं मशीन'

ABOUT THE AUTHOR

...view details