एनसीबीच्या छापेमारीत 4 जणांना अटक, अमली पदार्थ जप्त - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकऱण
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ विभागाकडून मुंबई आणि गोवा या ठिकाणी शनिवारी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एनसीबीने ४ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ५०० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
मुंबई- सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्स सिंडिकेटचा तपास करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) शनिवारी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत करमजीतसिंग आनंद या व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गांजा हस्तगत करण्यात आाला आहे. या बरोबरच दादर पश्चिम येथे केलेल्या कारवाईत गांजा पुरविणाऱ्या अँटनी फर्नांडिससह इतर दोन व्यक्तींना अटक केल्यानंतर तब्बल 500 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
एनसीबीच्या छापेमारीत पवईत राहणाऱ्या अंकुश अरनेजा (29) याच्या घरी 42 ग्रॅम चरस आणि तब्बल 1 लाख 12 हजार 400 रुपये नार्कोटिक्स विभागाने हस्तगत केले आहे. एनसीबीच्या गोव्यातील युनिटकडून करण्यात आलेल्या कारवाईत क्रिस कोस्ता या व्यक्तीलाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, एनसीबीने या पूर्वी अटक केलेल्या अनुज केशवानी याच्या चौकशीतून मिळणाऱ्या महत्वाच्या माहितीवरून एनसीबीचे जॉईंट डायरेक्टर समीर वानखडे यांच्या पथकाकडून सदरची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात बॉलिवूड मधील काही व्यक्तींची सुद्धा चौकशी केली जाणार आहे.