मुंबई - महिला रुग्णाच्या पोटातून तब्बल साडेचार किलो वजनाचा आणि 30 बाय 30 सेंटीमीटर रुंदीचा एक मांसाचा गोळा काढण्यात आला आहे. ही अवघड शस्त्रक्रिया घाटकोपर हिंदू सभा रुग्णालयात पार पडली. वंदना कर्डेकर, असे शस्त्रक्रिया करुन गाठ काढलेल्या महिलेचे नाव आहे.
महिलेच्या पोटातून काढली तब्बल साडेचार किलोची गाठ - stomach
महिला रुग्णाच्या पोटातून तब्बल साडेचार किलो वजनाचा आणि 30 बाय 30 सेंटीमीटर रुंदीचा एक मांसाचा गोळा काढण्यात आला आहे.
आठ महिन्यापासून वंदना यांच्या पोटात दुखत होते. अनेक दिवसांपासून पोटविकारामुळे त्यांच्या पोटात मासाचा गोळा तयार झाला होता. 2015 रोजी त्यांच्यावर उपचार झाले होते. मात्र, मागील काही दिवसापासून वंदना यांना एसीडीटी होणे, वजन कमी होणे, पोटात दुखणे, असा त्रास जाणवू लागला. यावेळी सोनोग्राफी करून चिकित्सा केली असता त्यांच्या पोटात 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचा मांसाचा गोळा तयार झाल्याचे आढळले. त्यामुळे वंदना यांच्यावर शस्त्रक्रिया करुन हा गोळा बाहेर काढण्यात आला.
पोटात अशा प्रकारे मांसाचा गोळा तयार होणे, हे अनुवंशिक आहे. त्यामुळे गोळा कसला आहे, हे तपासणीनंतर कळणार आहे. मात्र, इतका मोठा गोळा शस्त्रक्रिया करून काढणे, हे आवाहनात्मक कार्य होते, असे डॉक्टर हेमंत जैन यांनी सांगितले. त्याबरोबरच रुग्णाला या शस्त्रक्रियेमुळे जीवनदान मिळाल्यामुळे वंदना यांनी डॉक्टरांचे आभार मानले.