मुंबई -एअर इंडियाच्या AI1906 या क्रमांकाच्या विमानात प्रवासादरम्यान एका 42 वर्षीय एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडियाचे विमान 13 जूनला नायजेरियातील लागोस येथून उड्डाण करून रविवारी पहाटे 3.45 वाजताच्या दरम्यान मुंबई विमानतळावर उतरले होते. या विमानात प्रवासाच्या दरम्यान या 42 वर्षीय व्यक्तीला अचानक त्रास जाणवू लागला होता.
प्रवासादरम्यान विमानातील केबिन क्रुला या व्यक्तीने श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले. या व्यक्तीस विमानातील ऑक्सिजन मास्क देण्यात आला होता. दरम्यान, या प्रवाशाचे शरीराचे तापमानही वाढले होते. केबिन क्रुला या प्रवाशाने मलेरिया असल्याचे सांगितले. यानंतर विमानातील एका डॉक्टरने या प्रवाशास तपासून त्याची प्रकृती स्थिर करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरने व्यक्तीवर प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यानच प्रवाशाचा मृत्यू झाला.