मुंबई - मुंबईत आजघडीला 23 हजार 704 (21जुलै पर्यंतची आकडेवारी) अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 40 टक्के अर्थात 10 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घरच्या घरी उपचार घेत आहेत, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तर, याआधीही मोठ्या संख्येने रुग्ण होम क्वारंटाईन होते आणि ते बरे झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे. होम क्वारंटाइन रुग्णांवर 24 विभागातील वॉर रूम योग्य प्रकारे लक्ष ठेवून असल्याने घरीच राहून रुग्ण बरे होत असल्याचेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.
आयसीएमआरच्या नियमानुसार काही दिवसांपूर्वी कोणतीही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन करत त्यांच्यावर उपचार करण्यास पालिकेने सुरुवात केली. मुळात मुंबईत दिवसाला जितके रुग्ण आढळतात त्यातील 80 टक्के रुग्णांना लक्षणे नसतात. त्यामुळे या 80 टक्के रुग्णांपैकी 40 ते 50 टक्के रुग्ण घरीच क्वारंटाईन होत आहेत. त्यामुळेच आज मुंबईत 10 हजार रुग्ण घरी असून त्यांची योग्य ती काळजी वॉररुमद्वारे घेतली जात असल्याचे काकाणी यांनी सांगितले आहे.
घरात असलेल्या 10 हजार कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या संपर्कात राहणे आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हे मोठे आव्हानच आहे. पण 24 वॉररूममधील 102 एमबीबीएसचे विद्यार्थी आणि पालिकेचे कर्मचारी हे आव्हान यशस्वीपणे पेलत आहेत. त्यामुळेच आतापर्यंत अनेक होम क्वारंटाईन रुग्ण घरीच बरे झाले आहेत. तेव्हा होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यापासून तो रुग्ण बरा होण्यापर्यंतची प्रक्रिया ही महत्त्वाची आणि मोठी आहे. कोरोना चाचणी झाल्यानंतर सरकारी लॅब असो वा खासगी लॅब अहवाल रुग्ण जिथे राहतो त्या विभागातील यादी वॉररूमकडे जाते. ही यादी आयसीएमआरला पाठवली जाते. या यादीची विभागवार विभागणी करत वॉररूमला आयसीएमआर ही यादी पाठवते. त्यानंतर त्या-त्या विभागातील वॉर रूममधील कोरोना वॉरियर्स अर्थात एमबीबीएसचे विद्यार्थी आपल्या विभागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला फोन करतात. ते पॉझिटिव्ह असल्याची माहिती देतात. तसेच, त्यांच्याकडून त्यांची मेडिकल हिस्ट्री जाणून घेत त्यांना काही लक्षणे आहेत का हे विचारुन घेतात. सोबतच, घरात किती लोकं आहेत, घर किती मोठे आहे, स्वतंत्र शौचालय-स्नानघर आहेत का, स्वतंत्र खोली आहे का याचीही माहिती घेतात, अशी माहिती नायर रुग्णालयाचे सुपरस्पेशलिटी मेडिकल ऑफिसर डॉ विशाल राख यांनी दिली आहे.
ही माहिती घेतल्यानंतर रुग्णांची पुन्हा एक वर्गवारी तयार केली जाते. होम क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर, डेडीकेटेड कोव्हिड हॉस्पिटल अशी ही वर्गवारी असते. त्यानुसार ज्या रुग्णाला अजिबात लक्षणे नसतील आणि तो घरी क्वारंटाइन होऊ शकेल अशी व्यवस्था असते, त्याला होम क्वारंटाइन केले जाते. त्यानंतर तत्काळ पालिकेचे फिजिशियन डॉक्टर आणि अधिकारी रुग्णाच्या घरी जातात. त्याला आवश्यक ती व्हिटॅमिन सी, झिंक अशी काही औषधे देतात. रुग्णाचा मजला वा इमारत सील करत औषध फवारणी केली जाते. दरम्यान वॉररूममधून रुग्णाला कशी काळजी घ्यायची याची माहिती दिली जाते. तसेच पालिकेकडून सांगितलेले सर्व नियम पाळणे या रुग्णाला बंधनकारक असते असेही डॉ. राख सांगतात.
पाचव्या दिवशी वॉररूममधून रुग्णाला फोन केला जातो. त्याला काही लक्षणे नाहीत ना याची माहिती घेतली जाते. जर लक्षणे असतील तर त्याला कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात येते. जास्त काही त्रास असेल तर रुग्णालयात नेण्यात येते. पण काहीही त्रास नसेल तर त्याला होम क्वारंटाईनचे नियम पाळत 9 दिवस काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. 15 दिवसात त्याला काहीही लक्षणे आढळली नाहीत. तर मग त्याची कोरोना चाचणी न करता त्याला बरे झाल्याचे सांगत पुढचे आणखी काही दिवस काळजी घेण्यास सांगितले जाते. दरम्यानच्या काळात रुग्णाला काही वाटले तर त्याला 1916 यावर संपर्क साधत मदत हवी ती मदत घेता येते, असे ही डॉ राख यांनी सांगितले आहे. त्याचवेळी यातील काही रुग्ण खागसी डॉक्टरांचाही ऑनलाइन सल्ला घेताना दिसतात. तेव्हा अशाप्रकारे मुंबईत हजारो रुग्ण घरीच बरे झाले असून आता 10 हजार रुग्णही घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या भीतीच्या काळात ही नक्कीच मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल.