मुंबई : भांडुप येथे दोन दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेनेनं सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये शिवसेनेचे मुंबई महापालिकेचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी सार्वजनिक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात शिवीगाळ केली, असा आरोप एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात आला. भांडुप पोलीस ठाणे या ठिकाणी 29 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात मुलुंड न्यायालयामध्ये खटलादेखील दाखल करण्यात आला.
आरोपीला पोलीस कोठडी दिली पाहिजे : मुलुंड न्यायालयामध्ये हा खटला ताबडतोब दाखल झाला असता न्यायालयासमोर माजी महापौर दत्ता दळवी यांच्या वतीनं वकिलांनी नियुक्तीवाद केला की, पोलिसांनी दिलेली कलम 41 अंतर्गतची नोटीस महापौर दत्ता दळवी यांनी स्वीकारली नाही. हे काही गंभीर नाही. त्यामुळं यामध्ये पोलीस कोठडीची गरज नाही. मात्र शिंदे गटाच्या बाजूनं वकिलांनी बाजू मांडली की, यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे अशी शिवीगाळ करणं आणि बदनामी करणं हा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळंच यासंदर्भात आरोपीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. म्हणून मुलुंड न्यायालयानं याबाबत आरोपीला पोलीस कोठडी दिली पाहिजे.