मुंबई -ज्येष्ठ साम्यवादी नेत्या, माजी खासदार कॉम्रेड रोझा देशपाडे यांचे आज दादर येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहीत कन्या, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे.
साम्यवादी चळवळीच्या साक्षीदार कॉ. रोझा देशपांडे यांचे निधन
माजी खासदार आणि साम्यवादी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या कॉम्रेड रोझा देशपांडे यांचे आज दादर येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 1980 ते 1987 दरम्यान त्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय होत्या. आज त्यांची प्रकृती खालावल्याने दुपारी 12.30 च्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रोझा देशपांडे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य श्रीपाद अमृत डांगे यांच्या कन्या होत्या. 1980 ते 1987 दरम्यान त्या कम्युनिस्ट पार्टीमध्ये सक्रिय होत्या. देशपांडे या पाचव्या लोकसभेच्या सदस्य होत्या. सीपीआयच्या तिकिटावर उत्तर मध्य मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती. वृद्धापकाळामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. एप्रिल महिन्यात त्यांच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी झाले होते. शिवाय त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांना दादरच्या सुश्रृषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आज त्यांची प्रकृती खालावल्याने दुपारी 12.30 च्या सुमारास राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या सिद्धहस्त लेखिकाही होत्या. त्यांनी लिहिलेलं ‘एस. ए. डांगे : एक इतिहास’ हे पुस्तक विशेष गाजले. रोझा देशपांडे यांच्या निधनाने साम्यवादी चळवळीचा साक्षीदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.