मुंबई - भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी काँग्रेस नेते व मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अस्लम शेख यांनी करोना काळात मढच्या समुद्रात सर्व नियमांना डावलत बांधकाम करण्यासाठी मदत केली. यातून समुद्रात मोठी मोठी बांधकामे उभी राहिली, यातून जवळपास हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्या संदर्भात आता महाराष्ट्र पर्यावरण विभागाने अस्लम शेख यांना नोटीस बजावली आहे.
सीआरझेड नियमांचे उल्लंघन - काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री असलम शेख यांनी मुंबईत, मालाड, मढ येथे अनधिकृत पणे स्टुडिओ घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी सर्व सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून पाच स्टुडिओ समुद्रात उभारण्यात आले होते. हा घोटाळा एकंदरीत एक हजार कोटींचा असल्याचा आरोप ही सोमय्या यांनी केला होता. २०१९ मध्ये जेव्हा युतीचे सरकार होतं, त्यादरम्यान त्या ठिकाणी काहीही बांधकाम नव्हतं. परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मँग्रोजची कत्तल करून स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता या प्रकरणी याची दखल घेत महाराष्ट्र पर्यावरण विभागाने अस्लम शेख यांना नोटीस बजावली आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या -पर्यावरण विभागाने अस्लम शेख यांना नोटीस पाठवल्यानंतर या विषयावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, समुद्रात सर्व नियमांचं उल्लंघन करुन अशी बांधकामे केली जात आहेत. जवळपास हजार कोटींचा घोटाळा या ठिकाणी आहे. थेट समुद्रात स्टुडिओ आणि इतर बांधकामे केली आहेत, हा एक हजार कोटींचा घोटाळा अस्लम शेख व त्यांच्या मित्र परिवाराने केला आहे. या संदर्भामध्ये आता पर्यावरण विभागाने मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई महापालिकेला यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.