मुंबई :पालिकेचा २०२३-२४ चा मागील वर्षापेक्षा ७ हजार कोटी रुपयांची वाढ असलेला ५२ हजार ६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. २०२२- २३ चा ४५ हजार ९४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मागील वर्षापेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे १४.५० टक्के इतकी वाढ झाली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी हा अर्थसंकल्प सादर करताना २०२३-२४ च्या आर्थिक वर्षांत ८६६३.०६ कोटी तर तात्पुरते अंतर्गत हस्तांतरण निधीमधून ५९७० कोटी रुपये असे एकूण १४,६३३.०६ कोटी रुपये काढले जाणार असल्याचे सांगितले. मार्च २०२३ पर्यंत तात्पुरते अंतर्गत हस्तांतरण निधीमधून २३८० तर २०२३-२४ मध्ये ५९७० कोटी रुपये निधी उभारण्याचे प्रस्तावण्यात आले आहे. मुंबईकरांचा पैसे त्यांच्यासाठी वापरला जाणार असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्प तुटीत जाईल :मुंबई महापालिकेचे ८८ हजार कोटी रुपये बँकेमध्ये आहेत. यातील ४० हजार कोटी रुपये कंत्राटदारांना परत द्यावे लागणार आहेत. २५ हजार कोटी रुपये कर्मचारी अधिकारी यांचे ग्रॅच्युइटी आणि पेंशन देण्यासाठी लागणारा निधी आहे. या निधीला कोणीही हात लावू शकत नाही. उर्वरित २० हजार कोटींमधून १५ हजार कोटी रुपये काढण्यात आल्याने केवळ ५ हजार कोटी रुपये राखीव निधीमध्ये शिल्लक राहणार आहे. आयुक्त स्वतः पालिकेचा महसूल कमी झाल्याचे बोलत आहेत. यावरून येत्या दोन वर्षानंतर पालिकेचा अर्थसंकल्प तुटीत जाईल, अशी भीती रवी राजा यांनी व्यक्त केली आहे.