मुंबई: शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह दिले आहे. त्यानंतर शिंदे गटाने विधानभवन, लोकसभेतील पक्ष कार्यालय ताब्यात घेतले आहे. मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय शिंदे गट ताब्यात घेईल म्हणून उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पालिकेतील पक्ष कार्यालयाबाहेर तळ ठोकून आहेत.
शिवसेनेमध्ये फूट: शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबईत येऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोगाकडे गेला आहे. निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाराष्ट्रातील विधानभवन व लोकसभेतील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेतले आहे.
माजी नगरसेवक तळ ठोकून: विधानभवन आणि लोकसभा येथील पक्षाचे कार्यालय ताब्यात घेतल्यावर मुंबई महानगरपालिकेतील पक्ष कार्यालय शिंदे गट ताब्यात घेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रोज पालिकेत येऊन तळ ठोकून आहेत. शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक यांच्यात मागील महिन्यात वाद झाला होता. त्यावेळी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर पोलिसांच्या अहवालावरून शिवसेनेचे तसेच इतर पक्षांची कार्यालये पालिका आयुक्तांनी सिल केली आहेत.