मुंबई - मुस्लीम आरक्षण संविधानाला धरून नसेल तर त्याला आमचा विरोध असेल, अशी भूमिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ते विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.
आज (शुक्रवारी) विधानसभेमध्ये अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुसलमानांना देखील धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यासाठीचा प्रस्ताव मांडला. तसेच या आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे मलिक यांनी म्हटले. मात्र, याला आमचा विरोध आहे, असे म्हणत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. या अगोदर शिवसेना मुस्लीम आरक्षणाला विरोध करत होती. ती आता या सरकारमध्ये आल्यानंतर त्याला पाठिंबा देत आहे. तर आम्हाला हा मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देणे मान्य नाही. यामुळे ओबीसी आणि इतर अल्पसंख्याक समाजावर अन्याय होईल, असे म्हटले. तसेच महाविकास आघाडीच्या या तीन पक्षांमध्ये अगोदरच अनेक विषयांवर सेटिंग झालेली आहे, असा आरोप करत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.