मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त अनेक राजकीय नेते त्यांना सोशल मीडियावरून अभिवादन करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरून बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. त्यांनी आदरांजली अर्पण करताना बाळासाहेबांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला असून त्यांनी बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीची शिवसेनेला आठवण करून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
हेही वाचा -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज सातवा स्मृतिदिन; शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी
या व्हिडिओत स्वत: फडणवीस यांनी त्यांच्या आवाजात मनोगत व्यक्त केले आहे. “हिंदूह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सर्वांसाठी स्फुर्तीदायक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वैभव म्हणून ज्यांच्याकडं बघता येईल, असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब हे उर्जेचा स्त्रोत होते. छोट्यातील छोट्या माणसाला बाळासाहेबांच्या विचारानं ऊर्जा मिळायची. आपल्या एका वाक्यानं प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती,” असे फडणवीस यांनी व्हिडिओतून म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणातील स्वाभिमानाचा मुद्दा त्यांनी शिवसेनेला टोला लगावण्यासाठी व्हिडिओत घेतल्याचे दिसत आहे
हेही वाचा -मनोहर जोशींनी मातोश्रीवर जाऊन केले बाळासाहेबांना अभिवादन
स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.
तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे भाषण असलेला एक व्हिडिओ ट्विटर शेअर करण्यात आला आहे. "जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या पाठीवर असा दुसरा एकही व्यंगचित्रकार नाही की, ज्याने आपल्या कुंचल्याच्या सामर्थ्याने सर्वसामान्यांमध्ये वाघाची ताकद निर्माण केली", असे त्यात म्हटले असून बाळासाहेबांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काय वाट्टेल ते मी करेन, शिवसैनिक रूपी जी ताकद बाळासाहेबांनी निर्माण केली आहे, ती मी अजिबात वाया जाऊ देणार, असे म्हटले आहे.