पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, बाळासाहेबांनी कोणावरही आरोप केलेले नाहीत. पत्र जे सोशल मीडियावर फिरत आहे ते दाखवावे. अदानीने ज्या पद्धतीने लोकांचे पैसे लुटले आहे, त्याविरोधात आज (सोमवारी) आमचे आंदोलन आहे, अशा वावड्या उठवून भारतीय जनता पक्ष जनतेच्या प्रश्नाला परावर्तित करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
गणेशाच्या दर्शनानंतर उमेदवारी अर्ज :कसबा पोट निवडणुकीत महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आज (सोमवारी) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कसबा गणपती तसेच श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपचा बिनविरोध निवडणुकीतचा आग्रह : कसबा पोट निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सर्व राजकीय पक्षांना फोन करणार आहेत. यावर नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, याआधी आम्हीदेखील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. ज्या प्रथा परंपरेची गोष्ट ते करत आहेत त्यात ते फोनवरच चर्चा करत असतील आणि सत्तेची गुर्मी दाखवत असतील तर ते चुकीचे आहे. आम्ही संस्कृतीचे पालन नेहमी करत आलेलो आहे, असे यावेळी पटोले म्हणाले.
काँग्रेस पक्षात कुठेही आलबेल नाही :यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेस पक्षात कुठेही आलबेल नाही. वावड्या उठवणाऱ्यांना उठवू द्या. आम्ही सगळे एकत्रच इथे आहोत. काँग्रेस कधीही असे काम करणार नाही. आमच्यात एकोपा आहे आणि विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण पहिल्यांदाच आम्ही विदर्भातील दोन जागा जिंकल्या आहेत. आम्हाला मिळालेले यश पाहून भाजप वावड्या उठवत आहे. पण, त्याचा परिणाम होणार नाही, असेदेखील यावेळी चव्हाण म्हणाले. थोरात यांची नाराजी असेल तर याविषयी त्यांनाच विचारावे असे देखील यावेळी चव्हाण म्हणाले. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने उडालेली ही राळ आता कधी स्थिरावते ते पाहावे लागेल.
हेही वाचा :Tejendra Singh Tiwani on jitendra awhad : जितेंद्र आव्हाड जिथे दिसतील तिथे त्यांच्या कानशिलात लगाऊ, तेजेंद्र सिंह तिवानींचे वक्तव्य