नागपूर :राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची ( Agricultural Loss In Wild Animal Attack ) भरपाई दुप्पट करण्याची घोषणा वनमंत्री मुनगंटीवार यांनी विधानसभेत ( Double Compensation To Farmers ) केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतीच्या होणाऱ्या नुकसानीसंदर्भात आमदार अगरवाल यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. तर वनक्षेत्रात येणाऱ्या गावांना मदत करण्यासाठी वनग्राम निधी उभारण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
लक्षवेधी मांडली : रानडुक्कर, हरिण, वानर यांच्या हल्ल्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याबद्दल लक्षवेधी सदस्यांनी मांडली. कोरडवाहू शेतीचे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झाले तर प्रती हेक्टर पंचवीस हजार नुकसान भरपाई मिळत असे. ती आता हेक्टरी पन्नास हजार प्रस्तावित केली आहे. तर धानशेतीचे नुकसान झाल्यास हेक्टरी चाळीस हजार भरपाई दिली जात होती. ती आता हेक्टरी ऐंशी हजार केली गेली आहे. एका शेतकऱ्याला दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत ही मदत मिळू शकेल.असे मुनगंटीवार यांनी ( Forest Minister Sudhir Mungantiwar ) सांगितले.
वेळेत भरपाई न मिळाल्यास कारवाई :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीस दिवसांच्या आत नुकसान भरपाई द्यावी. ती न मिळाल्यास त्यांना त्यावर व्याज द्यावे. ते व्याज संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करता येईल का असा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी या लक्षवेधीवरील चर्चेत ( Action against officer delay in compensation ) सांगितले.
हत्तींना मूळ राज्यात परत पाठविणार : मानव वन्यप्राणी संघर्षाला अनेक पैलू आहेत. त्यात शेजारच्या राज्यातून येत असलेल्या हत्तींची भर पडली आहे. हत्तींच्या हल्ल्यात शेतीसोबतच घरे, अवजारे व वाहनांचेही नुकसान होऊ लागले आहे. कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात हत्तींच्या अतिक्रमणामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात भरपाईसाठी विशेष शासननिर्णय जारी करण्यात आला आहे अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
वनक्षेत्रातील गावांना कुंपण घालण्याचा प्रस्ताव : राज्यात एकूण 61 हजार चौरस किलोमिटर वनक्षेत्र आहे. या संपूर्ण जंगलास कुंपण घालता येणे शक्य नाही. मात्र वनक्षेत्रातील किंवा वनक्षेत्रालगत असलेल्या गावांना अंशतः कुंपण घालण्याचा प्रस्ताव असून त्यामुळे वन्यप्राणी मानव संघर्ष टाळता येईल असे ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. यासंदर्भात विविध प्रयोग सुरू असून गावा भोवती खंदक, विविध वनस्पतीचे जैव कुंपण, विजेचा झटका देणारे कुंपण, बांबूच्या वनाचे कुंपण असे अनेक प्रयोग प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतील गावांना व त्यातील शेतकऱ्यांना शतीभोवती विद्युत झटका कुंपण उभारण्याकरता 90 टक्के अनुदान प्रस्तावित आहे असेही ते म्हणाले.