मुंबई - राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे आणि त्याची प्रक्रिया ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून येत्या आठवड्याभरात पूर्ण केली जाणार आहे. मंत्रिमंडळाने दिलेल्या ठरावानंतर त्यांना याविषयीचा निर्णय हा १५ दिवसामध्ये घेणे आवश्यक असल्याने या आठवड्यात राज्यपालांकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या नावांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीपैकी एका सदस्याचे नाव तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगत, तर दुसऱ्या काही नावांमध्ये निकषांचे कारण देत राज्यपाल किमान तीन नावे नाकारण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
यामध्ये एक शिवसेना आणि दोन राष्ट्रवादीच्या सदस्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. राज्यपालांकडून प्रामुख्याने नुकतेच भाजप सोडून राष्ट्रवादीत सामील झालेले एकनाथ खडसे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे विरोधक म्हणून ओळख असलेले शेतकरी नेते राजू शेट्टी आणि शिवसेनेकडून देण्यात आलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांचेही नाव डावलले जाण्याची दाट शक्यता आहे. जुलै महिन्यात राज्यपाल नियुक्त जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून ६ नोव्हेंबरला १२ नावाच्या यादीचा प्रस्ताव राज्यपालांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर १५ दिवसात राज्यपालांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे, अन्यथा पुन्हा मंत्रिमंडळाकडून त्यासाठीची विनंती केली जाऊ शकते. तर, दुसरीकडे राज्यपालांनी आपल्या मर्जीनुसार निर्णय घेत काही नावे वगळली तर त्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करून उर्वरित नावे राज्यपालांना पाठवण्याची तरतूद असल्याची माहिती आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत सांगितले.
हिवाळी अधिवेशनापूर्वीच नियुक्तीची शक्यता
राज्यपालांची मागील काही महिन्यातील भूमिका लक्षात घेता त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत भर पडेल असेच निर्णय घेतलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावाचा निर्णय ते लवकर घेणार नाहीत, अशी मानसिकता महाविकास आघाडीतील नेत्यांची बनली आहे. तर, दुसरीकडे मुंबईत ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याने अधिवेशनापूर्वीच राज्यपाल काही नावे वगळून इतर नावांची घोषणा करतील असेही सांगितले जात आहे.