महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धरावीमधील गरिबांची भूक भागवण्यासाठी राज्याच्या एमआयडीसीकडून 2 लाख किलो शिधावाटप - food distribution by midc

नवी मुंबईतील महापे येथील एमआयडीसी कार्यालयातून दहा हजार पिशव्यांमध्ये दोन लाख किलो धान्य पॅक करण्यात आले. ते घेऊन निघालेल्या मालवाहू वाहनांना उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सीईओ पी. अनबलगल यांनी हिरवा झेंडा दाखवून धारावीच्या दिशेने सोमवारी रवाना केले.

dharavi food distribution
धरावीमधील गरिबांची भूक भागवण्यासाठी राज्याच्या एमआयडीसीकडून 2 लाख किलो शिधावाटप

By

Published : May 26, 2020, 6:19 PM IST

मुंबई - देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या आणि आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत हातावर पोट असलेला कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. मात्र, अत्यंत दाटीवाटीच्या गल्ल्या आणि कोरोना विषाणूचा फैलाव झाला असल्याने सर्व नागरिकांपर्यंत सोयी सुविधा पोहोचवण्यास प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी तब्बल दोन लाख किलो अत्यावश्यक अन्नधान्य तसेच वस्तूंचे सोमवारपासून स्थानिक सेवाभावींच्या साहाय्याने वाटप केले. धारावीतील दहा हजार कुटुंबांना शिधावाटपाचा लाभ होणार आहे.

नवी मुंबईतील महापे येथील एमआयडीसी कार्यालयातून दहा हजार पिशव्यांमध्ये दोन लाख किलो धान्य पॅक करण्यात आले. ते घेऊन निघालेल्या मालवाहू वाहनांना उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सीईओ पी. अनबलगल यांनी हिरवा झेंडा दाखवून धारावीच्या दिशेने सोमवारी रवाना केले. तांदुळ ५ किलो, गव्हाचे पीठ ५ किलो, खाद्यतेल १ लीटर, तूर डाळ १ किलो, रवा १ किलो, मसाला, मीठ, साबण इत्यादी गोष्टींचा समावेश दहा हजार पिशव्यांमध्ये करण्यात आला आहे.

धारावीतील ९० फूट रस्त्यावर असलेल्या कामराज ज्युनियर महाविद्यालयामध्ये शिधावाटप सुरू करण्यात आले आहे. दहा हजार कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी, शासनाने घालून दिलेल्या सर्व निर्बंधाचे काटेकोर पालन करण्यासाठी 35 स्थानिक स्वयंसेवकांची फौज तयार करण्यात आली आहे. कामराज महाविद्यालयाचे प्राचार्य मिशेल झेवियर, उद्योजक राजेंद्र राजन, सिने दिग्दर्शक सुसी गणेशन, स्थानिक समाजसेवक पेरीयस्वामी, रविचंद्रन आदींनी शिधावाटप गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी लक्ष घातले आहे. या सर्व उपक्रमाचे नियोजन एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता, मारुती कलकुटकी, एमआयडीसीचे अधिकारी, सहाय्यक अभियंता राजेश मुळे आणि प्रशांत चौधरी यांनी केले आहे. एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत धारावी येथील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनीही परीश्रम घेतले आहेत.

नवी मुंबईतील अण्णा किराणा या रिटेल स्टोअर्सचे संचालक सिवाकुमार रामचंद्रन यांच्या पुढाकाराने सदर शिधावाटप धारावीपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. गेल्या अडीच महिन्यांत सुभाष देसाई आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्यातर्फे महाराष्ट्रातील विविध भागातून स्थलांतरित झालेल्या लोकांना सुमारे तीन लाख किलो धान्य वस्तूंचे वितरण करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details