मुंबई- नवरात्र, दसरा-दिवाळी आणि ख्रिसमस असे मोठे सण आता एका मागोमाग एक येतील. तर सणासुदीचा काळ म्हटले की, आधी येतात ते म्हणजे गोडधोड पदार्थ आणि पंचपक्वान. त्यामुळे दरवर्षी सणासुदीच्या काळात रवा, बेसन, तेल, तूप, खवा-मावा, मिठाई अशा अन्न पदार्थांची मागणी वाढते आणि याअनुषंगाने अन्नभेसळ ही होते. तेव्हा दरवर्षीप्रमाणे अन्नभेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) ने 'विशेष मोहिमे'ला सुरुवात केल्याची माहिती शशिकांत केकरे (सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए) यांनी दिली आहे. या मोहिमेनुसार फूड सेफ्टी व्हील अर्थात फिरत्या प्रयोगशाळा बाजारपेठांमध्ये जाऊन अन्न पदार्थांची चाचणी करत आहेत. तर मुंबईभरातील अन्न सुरक्षा अधिकारीही पाहणी करत नमुने तपासणीसाठी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दसरा-दिवाळीतील अन्न भेसळ रोखण्यासाठी एफडीएने कंबर कसली - भेसळयुक्त अन्नपदार्थांचे सेवन
दसरा-दिवाळी आणि ख्रिसमसमध्ये फराळ अर्थात विविध अन्नपदार्थ घरोघरी बनवले जातात. त्यामुळे या सणासुदीच्या काळात रवा, बेसन, तेल, तूप, खवा-मावा, पीठीसाखर, साखर, डाळी, ड्राय फ्रुटस अशा सर्वच अन्न पदार्थांची मागणी वाढते. या वाढत्या मागणीचा फायदा घेत भेसळखोर सक्रिय होतात, भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रीसाठी बाजारात आणतात.
हेही वाचा -ग्रंथालये-वाचनालये आजपासून सुरू; नियमावली न मिळाल्याने व्यवस्थापकांमध्ये संभ्रम
हे आव्हान पेलण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर अर्थात नवरात्र ते ख्रिसमस दरम्यान विशेष मोहीम राबवली जाते. त्यानुसार आता या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सर्व अन्न सुरक्षा अधिकारी किराणा दुकान आणि मिठाई दुकानाची तपाणसी करत आहेत. या तपाणसीत अन्न पदार्थांचे नमुने घेत ते प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. तर संशयानुसार अन्न पदार्थांचा साठा सीलही करण्यात येणार आहे. दरम्यान, तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्याचा अहवाल आल्यानंतर, त्यात दोषी आढळल्यानंतर सील साठा नष्ट करत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही केकरे यांनी सांगितले आहे.
एकीकडे अन्न सुरक्षा अधिकारी कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे दोन फिरत्या प्रयोगशाळा ही विविध बाजारपेठात जाऊन अन्न पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी करत आहेत. या फिरत्या प्रयोग शाळेचा मोठा उपयोग होताना दिसतो. कारण या प्रयोगशाळेद्वारे तिथल्या तिथे काही अन्न पदार्थांची तपासणी काही मिनिटात करता येते. तेच नमुने घेत प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी आणि मग त्याचा अहवाल येण्यासाठी बरेच दिवस लागतात. तेव्हा या फिरत्या प्रयोगशाळा एफडीएच्या ताफ्यात दाखल झाल्या एफडीएच्या कामाला वेग आला आहे. दरम्यान सध्या दोन फिरत्या योगशाळा एफडीएकडे असुन या आता दक्षिण मुंबईतील बाजारामध्ये फिरत तपासणी करत असल्याचेही केकरे यांनी सांगितले आहे. आतापर्यंत कुठेही मोठ्या साठा जप्त करण्यात आलेला नाही. पण आता जसा दसरा जवळ येईल तसे अन्न भेसळीची प्रकरणे पुढे येतील अशी शक्यता आहे.
हेही वाचा -राज्यात मुसळधार; सोलापूर, पुणेमध्ये पूर परिस्थिती, एनडीआरएफ पथक रवाना
एफडीए नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सण सुरक्षित साजरे व्हावे यासाठी सज्ज झाली आहे. अन्न भेसळ रोखण्यासाठी कामाला लागली आहे. पण त्याचवेळी नागरिकांचीही जबाबदारी आहे की त्यांनी अन्नपदार्थ खरेदी काळजीपूर्वक करावी. नोंदणी कृत दुकानातूनच खरेदी करावी, खरेदी बिल घ्यावे. महत्वाचे म्हणजे काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित एफडीएशी संपर्क साधला असे आवाहन केकरे यांनी केले आहे.