मुंबई -तडकाफडकी ५५५ शिक्षकांचे एक दिवसात समायोजन करण्याचा मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे आदेश आलेल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. (दि. ३ जानेवारी) दुपारी असे आदेश शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी दिले आणि (दि. ४ जानेवारी)ला शिक्षकांना हजर होण्यासाठी सांगितले होते. बहुतेक शिक्षकांनी यावर बहिष्कार टाकला असून, २०० शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय गाठले तेथे ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेतली होती.
खुलासा मागवला : शिक्षक परिषद मुंबई विभागाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. कोकण शिक्षक मतदारसंघात निवडणूक असून, मुंबईत शिकवणारे शिक्षक कोकण शिक्षक मतदारसंघात मतदार आहेत. त्यामुळे मतदार प्रभावित करण्यामागे काही लोक आहेत. निवडणूक आयोगाने यांची दखल घेऊन काल ११ जानेवारी रोजी शिक्षण सचिवाना पत्र लिहून तत्काळ खुलासा मागितलेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबईचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली आहे.
असे झाले नुकसान : माध्यमिक शाळेतील विषय शिक्षक जे २५/३० वर्ष एकच विषय शिकवत आहेत त्यांना अचानक प्राथमिक शाळेत समायोजन करून सर्व विषय शिकवायला सांगितले आहे. रात्रशाळेतील शिक्षक काढून, घेऊन मुंबई मनपाला तात्पुरते पाठवल्याने अनेक रात्र शाळेत शिक्षक नाही. ही बाब शिक्षण अधिकारी व सचिव यांना कळवून अद्याप दखल घेतली नाही.. त्यामुळे १० वी च्या पूर्व परीक्षा प्रभावित झाल्या आहेत.
अल्पसंख्याक शाळेत रिक्त जागा : शालेय शिक्षण विभागाच्या अल्पसंख्याक माध्यमिक शाळेत जागा रिक्त असून, तेथे आम्हाला पाठवा किंवा रात्र शाळेत राहू द्या प्राथमिक शाळेत तात्पुरते समायोजन नको, कायमस्वरूपी समायोजन करा. तसेच,वेतन संरक्षण व सेवा काऊंट करण्याची मागणी शिक्षक करत आहेत. अशा तत्काळ समायोजनामागै अर्थकारण असून, शालेय शिक्षण विभागाच्या अल्पसंख्याक व रात्र शाळेतील जागा बाहेरून भरून घेण्यासाठी डाव सुरू असून, शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणूक आयोग याबाबत काय भूमिका घेणार हे कळेलच, पण कोकण शिक्षक मतदारसंघ सर्वत्र यांची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : वादळी घडामोडीनंतर वडिलांची माघार! नाशिक पदविधरमधून सत्यजीत तांबे अपक्ष मैदानात