मुंबई:मुंबईत असलेली ट्राफिकची समस्या अत्यंत जटील असून त्यासाठी नवीन पर्याय शोधणे गरजेचे आहे. भविष्यात हवेत उडणारी डबल डेकर बस (Flying Double decker bus in mumbai) मुंबईत यायला हवी आणि हवेत उडणारी डबल डेकर बस आल्यावरच लोकांची ट्राफिकची समस्या सुटू शकेल, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. (mumbai traffic problem). ते मुंबई आयआयटी (bombay iit) मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
पेट्रोल आणि डीजल वाहनांची संकल्पना हद्दपार करणार: पुढील महिन्यात इ ट्रॅक लाँच करण्याचा प्लॅन असल्याचे नितीन गडकरी यांनी जाहीर केले. तसेच डीजल आणि पेट्रोल सारखी इंधन वाहनांची संकल्पनाच हद्दपार करायची आहे असे देखील ते म्हणाले. आज मुंबईत मोठ्या प्रमाणात इ-बसेसच चालतात आणि या बसेस मुळे इंधनावरचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे इ- ट्रॅक लवकरात लवकर आणणे गरजेचे असल्यासही या कार्यक्रमातून नितीन गडकरी यांनी सांगितले. या सर्व नवीन संकल्पना ह्या आयआयटी शिवाय शक्य होणे कठीण आहे, त्यामुळे या सर्व संकल्पनांमध्ये आयआयटीच्या विद्यार्थ्यांची साथ महत्त्वाची असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.
मुंबई आयआयटीचे विद्यार्थी रिसर्च वर देतात भर: केंद्रीय रस्ते परिवहन व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबई आयआयटीला भेट दिली. यावेळी तेथील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी देखील गडकरी यांनी संवाद साधला. हा संवाद साधत असताना अनेक महत्त्वाच्या नव्या शोधाबाबत त्यांनी आपले अनुभव सांगितले. मुंबई आयआयटीचे विद्यार्थी आणि देशभरातील इतर आयआयटी मधील विद्यार्थी यांच्यात मोठा फरक आहे. मुंबई आयआयटीचे विद्यार्थी नेहमीच रिसर्च वर मोठा भर देतात आणि यातूनच नव्या संकल्पना उदयास येतात, अशी स्तुती गडकरींनी केली. यासोबतच त्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांसमोर मुंबईमध्ये असलेल्या ट्राफिक समस्येचा पुनरुच्चार केला. ट्रॅफिकची समस्या पाहता येणाऱ्या काळात ई -हायवे बनवण्याचा विचार असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले. इ-हायवे बनवण्यासाठी देखील आयटीच्याच विद्यार्थ्यांची गरज भासेल असे गडकरी म्हणाले.
दिल्लीतील राजकीय वातावरण वेगळे:मी सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्रातून दिल्लीत काम करायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रातील ज्या अनेक नेत्यांना मोठे समजत होतो ती तेवढी मोठी नव्हती. याउलट ज्या लोकांना मी लहान समजत होतो तीच लोकं विचाराने मोठी निघाली, असा आपला अनुभव नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसमोर मांडला. दिल्लीत काम करायला सुरुवात केली होती त्यावेळेस दिल्लीतल्या पाणी दूषित आहे, हवा दूषित आहे याबाबत आपण वरिष्ठ समजल्या जाणाऱ्या नेत्यांसोबत संभाषणही केलं मात्र त्यावर कोणताही तोडगा त्यावेळी काढण्यात आला नव्हता. नेत्यांच्या अहंकाराला खूप जपावं लागतं या अहंकारामुळे अनेक वेळी काम होताना भरपूर वेळ जात होता, असा अनुभव ही गडकरी यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.