मुंबई:राज्यात आज ६६९ रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आज राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज ४३५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या ८१ लाख ४४ हजार ७८० रुग्णांची नोंद झाली आहे. यामधून ७९ लाख ९३ हजार ०१५ रुग्ण आजारमुक्त झाले. आतापर्यंत प्राप्त आकडेवारीप्रमाणे १ लाख ४८ हजार ४४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ३३२४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत १८९ रुग्ण:मुंबईत काल १७७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात किंचित वाढ होऊन १८९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा ११ लाख ५७ हजार २८२ वर पोहचला आहे. मुंबईत मागील काही दिवसांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईत एकूण १९ हजार ७४७ मृत्यू नोंद झाले आहेत. मुंबईत ११ लाख ३६ हजार ५१४ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या १०२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ८२ रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यापैकी २८ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.
राज्य सरकार सज्ज:राज्यात सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर या सहा जिल्ह्यात पॉजीटिव्हीटी रेट वाढला आहे. रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने कोविड १५८९ रुग्णालयांमध्ये ५१३८० आयसोलेशन खाटा तसेच ४९८८९ ऑक्सीजन बेड, १४४०६ आय. सी. यू. बेड तसेच ९२३५ व्हेंटीलेटर्स सज्ज ठेवली आहेत. ऑक्सिजनची कमी पडणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे.