मुंबई - वातावरणातील बदलामुळे मार्च महिन्यात काही दिवस तर लोकांनी तिन्ही मोसमांचा अनुभव घेतला. रात्री उशिरा आणि पहाटे थंडी पडत असल्याचे लोकांनी अनुभवले. तर दुपारी उकाड्याने लोक हैराण होत होते. संध्याकाळी आभाळ दाटून येऊन पावसाच्या सरी पडत होत्या. त्यामुळे नेमका कोणता ऋतु सुरू आहे हेच कळत नव्हते. याच वातावरणात आता कमी दाबाच्या पट्ट्याची भर पडल्याने अवकाळी पावसाचा अंदाज आहे. बंगालचा उपसागर आणि खाडी परिसरत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी राज्यात मुंबई पुण्यासह इतर भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजनने ही शक्यता वर्तवली आहे. तसेच गारपिटीने नुकसान होण्याची शक्यता आहे.
मुंबई पुण्यात अलर्ट जारी - राज्यातील काही भागात, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गारपीट व अवकाळी पावसाचे ढग दाटून आहेत. हवामानातील या बदलांचा परिणाम मुंबई पुण्यासह मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र यासोबतच धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांना विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.