मुंबई -भायखळा येथील राणीच्या बागेत मुंबईचे वैभव अवतरले आहे. पालिकेच्या उद्यान विभागाकडून राणीबागेत झाडे आणि फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यात गेट वे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट, बेस्टची पहिली बस असलेली ट्राम, कापड गिरणी, चिमणी, पेंग्विन, चित्रनगरीचे प्रतीक असलेला कॅमेरा, मुंबईचा डबेवाला यांच्या पाना-फुलांपासून बनलेल्या प्रतिकृतीचे आकर्षक देखावे तयार करण्यात आले आहेत.
हेही वाचा -'मूकनायक' शताब्दी : 'बाबासाहेबांना पत्रकार म्हणून स्वीकारले पाहिजे'
पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे दरवर्षी फुलझाडे, फळझाडांचे उद्यान प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी 'मुंबईचे मानबिंदू' ही प्रदर्शनाची संकल्पना असून त्याअंतर्गत या प्रतिकृती तयार केल्या आहेत. प्रदर्शनाचे हे रौप्य महोत्सवी (२५ वे) वर्ष आहे. वीरमाता जिजामाता भोसले उद्यानात मध्यवर्ती संकल्पना घेऊन उद्यान खात्यातर्फे दरवर्षी उद्यान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनात कुंड्यांमध्ये वाढवलेली फुलझाडे, फळझाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोन्साय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनाबरोबरच विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकामाविषयक पुस्तके खरेदी दालनात ठेवण्यात आली आहेत.
हेही वाचा -'सारथी' संस्थेमध्ये मोठा घोटाळा; अनियमिततेच्या अहवालात धक्कादायक माहिती