मुंबई- पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. ३६ तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. पण, मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील पूरग्रस्तांना वेळेवर मदत पोहोचली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.
पूर्व विदर्भातली पुराची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. मुळात मध्य प्रदेश सरकारशी योग्य समन्वय नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. राजीव सागरमधून पाणी सोडल्यानंतर ३६ तासांनी ते पाणी विदर्भात पोहोचते. या ३६ तासात अलर्ट देऊन लोकांचे नुकसान टाळता आले असते. भंडारा जिल्ह्यातील जवळजवळ ५ हजार कुटुंब अस्ताव्यस्त झालेच नसते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.