नवी मुंबई - येथील खाडी परिसरात गुजरातच्या कच्छ किनाऱ्यावरून रुबाबदार आणि दिमाखदार दिसणाऱ्या गुलाबी रंगाच्या रोहित पक्ष्यांचे म्हणजे फ्लेमिंगोंचे मोठ्या संख्येने आगमन होते. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात त्यांच्या असंख्य थव्यांमुळे खाडीपात्रात ठिकठिकाणी गुलाबी छटा डोळे दिपवून टाकत असतात.
नवी मुंबईत फ्लेमिंगोचे आगमन ऐरोलीतील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात पक्षीप्रेमी, पर्यटकांसाठी बोटीतून खाडीतून फ्लेमिंगो सफारी सुरू करण्यात आली आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे फ्लेमिंगो पक्षी येण्यास उशीर झाला असल्याचे वनाधिकारी नथुराम कोकणे यांनी सांगितले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने येतील असेही ते म्हणाले. हे रोहित पक्षी बघण्यासाठी खाडीसफरीला १५ नोव्हेंबरपासून जवळपास ३०० प्रवाशांनी बोटिंगने प्रवास केल्याचे वनविभागाने सांगितले.
हेही वाचा - प्रकल्पाचा आढावा घेणे म्हणजे स्थगिती नाही - एकनाथ शिंदे यांचे भाजपला उत्तर
अवकाळी पावसामुळे हिवाळा लांबल्याने फ्लेमिंगोच्या हंगामाला उशिरा सुरुवात झाली, मात्र सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोची संख्या वाढली असल्याने पक्षीप्रेमी यांचा खाडीसफरीकडे कल वाढला आहे. नवी मुंबईतील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात शहरातील शालेय विद्यार्थ्यांसह परदेशी विद्यार्थी या केंद्राला भेट देत आहेत. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी असून या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी मोफत प्रवेश दिला जात आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सागरी जैवविविधतेची अधिक माहिती करून देण्यासाठी वन विभागाच्या वतीने मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील ऐरोलीत २६ किलोमीटरच्या खाडी परिसरात २०० हून अधिक पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडीकिनाऱ्यावर दरवर्षी आश्रयाला येतात. यात पेटंट स्टार्क, पाइट, स्टील्ट, गल, ग्लोवर आदी परदेशी पक्ष्यांचा समावेश आहे. हे पक्षी पाहण्यासाठी बोटिंग सफारीची सोय असल्याची माहिती एन. जे. कोकरे, वन परीक्षेत्र अधिकारी, वन विभाग ऐरोली. यांनी दिली.
हेही वाचा -मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवैध गुटख्याची वाहतूक; दोघांना अटक