मुंबई :टेरेसा फर्नांडिस नावाची एक स्पॅनिश महिला मुंबईत पर्यटनासाठी आली होती. मुंबई नजीकच्या एलिफंटा गुफामध्ये पर्यटनाला जात असताना अचानक बसमध्येच ही महिला 5 जानेवारीला कोसळली. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने या महिलेला खूप त्रास झाला. यादरम्यान महिलेला जसलोक रुग्णालयात दाखल करत तिच्यावर ताबडतोब उपचार सुरू करण्यात आले. अतिशय उच्च रक्तदाब असल्याने महिलेच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. हे रक्त मेंदूत पसरल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अवघड होऊन बसले होते. अशातच महिलेचा रक्तदाब कमी होत नसल्याने शस्त्रक्रिया करणे अवघड गेले. मात्र तरीही महिला वाचू शकली नाही, अशी माहिती रुग्णालयातील न्यूरो सर्जन डॉ. आजाद इराणी यांनी दिली. ब्रेन डेड झाल्याने डॉक्टरांना पुढे काहीच करता आले नाही.
महिलेच्या इच्छेनुसार अवयव दान : महिलेला मृत घोषित करण्यात आल्यानंतर या स्पॅनिश महिलेची मुलगी सात तारखेला भारतात पोहोचली होती. या मुलीने आईच्या इच्छेनुसार तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कुटुंबाच्या परवानगीने या महिलेच्या शरीरातील हृदय चेन्नई मधील एका रुग्णाला देण्यात आले. फुफ्फुस दुसऱ्या रुग्णाला देण्यात आले. यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड एका स्थानिक रुग्णाला देण्यात आले. त्यामुळे या सर्वांचा जीव वाचला.
पाच रुग्णांना मदत : टेरेसा फर्नांडिस यांच्या अवयवदानामुळे पाच रुग्ण त्रासापासून मुक्त झाले आहेत. टेरेसा फर्नांडिस यांच्यामागे मुलगी आणि मुलगा असे कुटुंब आहे. त्या एका रुग्णालयातून फार्मसी आणि मायक्रोलॉजी विभागातून नुकत्याच निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी आइसलँड आणि साऊथ कोरिया या देशांचाही दौरा केला होता, अशी माहिती त्यांची कन्या पिरेज यांनी दिली. पिरीज यांनी आपल्या आईच्या अस्थी शुक्रवारी स्मशानभूमीतून ताब्यात घेतल्या.