मुंबई -इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार समोर येताच मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर नियमावली जाहीर केली. मात्र, २१ डिसेंबरला इंग्लंडहून मुंबईला आलेल्या १८७ प्रवाशांपैकी ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व रूग्णांना पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात स्वतंत्र विभागात दाखल करण्यात आले आहे. पालिकेने आता या रुग्णांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे पाठवले आहेत. ज्यामुळे या प्रवाशांना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनची लागण झाली आहे की नाही, हे समोर येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
नवा कोरोना स्ट्रेन -
मुंबईतील कोरोना पूर्णपणे नियंत्रणाखाली आला आहे. परंतु, इंग्लंडमधील विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे देशभर भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून इंग्लंडहून येणाऱ्या विमानांना भारतात उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशात कोणताही नवीन व्हायरसचा रुग्ण येऊ नये, यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे. त्याआधी आलेल्या प्रवाशांना पालिकेने हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले आहे. २१ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत एकूण १८७ प्रवासी इंग्लंडहून मुंबईत दाखल झाले होते. पालिकेने प्रोटोकोल अंतर्गत विमानतळावरून हॉटेलमध्ये त्यांना विलगीकरणात ठेवले होते.
पाच प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह -
या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी पाच दिवसानंतर घेण्यात आली. रविवारी या चाचणीत पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. या सर्व रुग्णांना प्रोटोकॉल अंतर्गत सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांना कोविडच्या इतर रुग्णांपासून वेगळे ठेवले आहे. या सर्व पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांचे नमुने पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आहे.
हेही वाचा - पार्थच्या उमेदवारीचा निर्णय स्थानिक नेतृत्त्व घेईल - रोहित पवार