मुंबई : कोरोनावर संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी एकीकडे प्रयत्न केले जात असताना राज्यात सोशल माध्यमांवर अफवा पसरवण्यात येत आहे. काही समाजकंटक मोठ्या प्रमाणावर जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे, सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, अशा गुन्हेगारांच्या विरोधात महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत.
राज्यात सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात लॉकडाऊनच्या काळात तब्बल 512 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, याप्रकरणी आतापर्यंत 273 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी व्हाट्सअॅप संदेश फॉरवर्ड केल्याप्रकरणी 196 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 214 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिकटॉक सारख्या सोशल माध्यमांवर व्हिडिओ शेअरप्रकरणी 28 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 11 गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, ऑडिओ क्लिप्स, व युट्युबसारख्या अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी 60 गुन्हे दाखल झाले आहेत. दाखल करण्यात आलेल्या या सर्व गुन्ह्यात 273 आरोपींना अटक झाली आहे.