मुंबई - मासेमारी करणाऱ्यांच्या उपजीविकेवर लॉकडाउनचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारने मासेमारीला परवानगी दिली आहे. मात्र, मासेमारी केल्यानंतर हे मासे विकायचे कुठे? असा प्रश्न मच्छीमारांपुढे उभा आहे. दक्षिण मुंबईतील भाऊंचा धक्का, ससून डॉक आणि क्रॉफेड मार्केट येथे माशांची मोठी बाजारपेठ आहे. मात्र, मासे विक्रीला अद्याप परवानगी नसल्याने केवळ मासेमारीची परवानगी देऊन काय साध्य होणार? असा सवाल कोळी बांधव करत आहेत.
'मासेमारीची परवानगी तर दिली, पण विकायचे कुठे?' - लॉकडाउन इफेक्ट
सरकारने मासेमारीला परवानगी दिली तशीच मुंबईतील विविध बाजारात देखील मासेविक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे. मासेविक्रीला परवानगी नसल्याने सध्या राज्यात अतिशय कमी पाच ते दहा टक्के बोटीवरून मासेमारी होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने मासेमारीला परवानगी दिली तशीच मुंबईतील विविध बाजारात देखील मासेविक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली आहे. मासेविक्रीला परवानगी नसल्याने सध्या राज्यात अतिशय कमी पाच ते दहा टक्के बोटीवरून मासेमारी होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत महापालिकेच्या ताब्यात ६२ मासळी विक्री बाजार आहेत. त्याचबरोबर गावठाणे आणि कोळीवाडे मिळून ४० बाजार आहेत. एकंदर बृहनमुंबईत १०२ मासळी बाजार असले तरी मासे विक्रीला परवानगी नसल्याने अनेक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे तांडेल यांनी सांगितले.
मासे विक्री करणाऱ्या अनेक महिला सध्या घरीच असल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन नाही. कुलाब्याच्याजवळ बुधवार पार्क इथे जेट्टीवरवरील लहान बोटींपैकी पन्नास टक्के बोटीवरून मासेमारी होते. मात्र, हे मासे घरीच खाण्यासाठी आणले जातात अशी माहितीही त्यांनी दिली. सरकारने त्वरित मासे विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मत्स्य विकास मंत्री असलम शेख यांना लिहिले असल्याचे तांडेल यांनी ईटीव्ही भारत सोबत बातचीत करताना सांगितले .