महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साहित्यिक, कवयित्री, सनदी अधिकारी नीला सत्यनारायण.. - first woman election commissioner

नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारी म्हणून तब्बल ३७ वर्षांची कारकिर्द राहीली. या काळात त्यांनी गृह, वन, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या महत्वाच्या खात्यांचे काम पाहिले. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले.

nila satyanarayan
नीला सत्यनारायण..

By

Published : Jul 16, 2020, 10:21 AM IST

Updated : Jul 16, 2020, 10:56 AM IST

मुंबई- राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्य नारायण यांचे आज मुंबईतील सेव्हनहिल रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सनदी सेवेत असलेल्या सत्यनारायण यांनी साहित्य आणि कला क्षेत्रातही ठसा उमटवला होता. मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये त्यांनी लिखाण केले. त्यांना २००७ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. सनदी अधिकारी, कवयित्री, साहित्यिक असणाऱ्या नीला सत्यनारायण यांच्या जीवनप्रवासाचा धावता आढावा...

नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ मुंबईत झाला. त्या १९७२च्या बॅचच्या (आता निवृत्त) सनदी अधिकारी होत्या. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या. याशिवाय त्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून 'बाबांची शाळा' हा मराठी चित्रपट निघाला. त्याचे संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केले होते.

नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारी म्हणून तब्बल ३७ वर्षांची कारकिर्द राहीली. या काळात त्यांनी गृह, वन, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या महत्वाच्या खात्यांचे काम पाहिले. धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले.

नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक १० आवृत्त्या ओलांडून पुढे गेले आहे. ‘सत्यकथा’ हे त्यांचे पुस्तक उद्योजकतेबाबत आहे. आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे त्या वन विभागात सचिव असताना त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित आहे. त्याच्या टाकीचे घाव या पुस्तकाला २०१५ मध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचा ललित गद्यासाठीचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार मिळाला होता. तसेच नीला सत्यनारायण यांना त्यांच्या सांस्कृतिक योगदानाबद्दल १९८५ ला केंद्र शासनाचा अहिंदी भाषिक लेखक पुरस्कारानेही सन्मानित कऱण्यात आले होते,

नीला सत्यनारायण यांची ओळख एक आय.ए.एस. अधिकारी म्हणून जशी आहे तशीच एक कवयित्री आणि लेखिका म्हणूनही आहे. त्यांचे आजवर 9 कविता संग्रह, 5 कादंबर्‍या आणि विपुल ललित लेखन प्रसिद्ध झाले आहे, तसेच लोकप्रियही झाले आहे. त्यांच्या लिखाणाचा मूळ आशय नेहमीच सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचा राहिलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे साहित्य आशयघन आणि सकस आहे.

‘एक पूर्ण अपूर्ण’

नीला सत्यनारायण याचे 'एक पूर्ण अपूर्ण' या चरित्रातून त्यांनी त्यांच्यातील संवेदनशील, खंबीर आईचे आणि धडाडीच्या, साहसी स्त्रीचे दर्शन घडवले आहे. मतिमंद मुलाच्या आईवर झालेला आघात आणि त्या आघातातून सावरताना तिने दाखविलेल्या धैर्याची, प्रगल्भतेची जाणीव या चरित्रातून होते.

सनदी अधिकारी म्हणून त्यांनी राज्य सरकारच्या अनेक जबाबदाऱ्याही यशस्वीरीत्या पेलल्या आहेत. एक प्रशासक आणि कवी मन असलेल्या श्रीमती सत्यनारायण यांनी लिखाणही पुष्कळ केलेले आहे. आणि याच कवी मनाने त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

Last Updated : Jul 16, 2020, 10:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details