मुंबई : राजधानी मुंबईतील मंत्रालय हे नेहमीच नागरिकांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी गजबजलेले असते. सर्वसामान्य माणसांपासून ते आमदार, खासदार, मंत्री दररोज मंत्रालयात येत असतात. सर्वसामान्य व्यक्तींना दुपारनंतर मंत्रालयात प्रवेश दिला जातो. त्यामुळे दुपारी दोन वाजता मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सुमारे एक किलोमीटरच्या रांगा लागलेल्या असतात. नागरिकांना मंत्रालयात प्रवेश मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता लवकरच या समस्येवर उतारा मिळणार असून, केवळ चेहरा दाखवल्यानंतर नागरिकांना मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. केवळ काही सेकंदात चेहरा दाखवून प्रवेशिका तयार करताच मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी फेशियल रिकॉग्निशन सिस्टम म्हणजेच एफआरएस ही प्रणाली राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडल्याची माहिती, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नानूटीया यांनी दिली.
काय आहे सध्याची प्रणाली : मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी सध्या नागरिकांना त्यांचे आधार कार्ड किंवा कोणतेही एक ओळखपत्र दाखवून प्रवेशिका दिली जाते. मात्र यासाठी बराच वेळ लागतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी तर मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असते. त्या दिवशी ही रांग एक किलोमीटर पर्यंत दूर जाते आणि मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. मात्र आता या समस्येवर मात करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने एफआरएस ही प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे.