मुंबई : 'भाजपचे नेते प्रथम बोलतात. त्यानंतर राष्ट्रीय तपाय यंत्रणेकडून (एनआयए) काही माहिती बाहेर येते. याचा अर्थ तपास चालू आहे की राजकारण चालू आहे? याचा अभ्यास करण्यासारखी परिस्थिती निर्माण होतेय', अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मांडली आहे. राज्यात सुरू असलेल्या सगळ्या घडामोडी व गोष्टीमागे सरकार कधी जाईल? याची वाट पाहणार्या लोकांची शक्ती आहे का? अशीही शंका त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते माध्यमांशी बोलत होते.
जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल एनआयएच्या अटकेतील व्यक्तिचे पत्र बाहेर येणं, हा काय प्रकार?
भाजपच्या नेत्यांनी "दोन दिवस थांबा, अजून एक विकेट पडणार आहे" अशा आशयाचे भाष्य करणे. त्यानंतर एनआयएच्या अटकेत असलेल्याचे पत्र प्रसारमाध्यमांना प्राप्त होणे. त्यात एक- दोन नांव समाविष्ट होणे, हा काय प्रकार आहे? असा सवालही जयंत पाटलांनी केला.
भाजपचं राजकारण ठाकरे सरकारच्या लक्षात आलंय
आता जे पत्र बाहेर आलं आहे. त्यावर मंत्री अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. इतर नावं घेतली असतील, तर त्यात तथ्य आहे की नाही? हे पत्र वाचल्यावरच कळतं. त्यामुळे यामागे भाजपचं राजकारण आहे, हे राज्यसरकारच्या लक्षात आले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ सापडली. त्या गाडीत स्फोटके होती. ही गाडी मनसुख हिरेन यांची होती, असे समोर आले. या घटनेनंतर हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला. या दोन्ही प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे एनआयएच्या अटकेत आहे. त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप केले. यामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर सचिन वाझेनेही धक्कादायक आरोप करणारे पत्र लिहिले.
सचिन वाझेच्या पत्रात नेमकं काय?
निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेने एनआयए कोर्टात एक पत्र देऊन परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. 'अनिल परब यांनी आपल्याला जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) कडून ५० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून ५० लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता' असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे.
भाजप नेत्यांच्या दाव्यानंतर वाझेचे पत्र बाहेर
परमबिर सिंग यांच्या आरोपानंतर जयश्री पाटील या महिलेने अनिल देशमुखांची चौकशी करण्यासंबंधीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला देशमुखांची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर देशमुखांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा स्वतःहून राजीनामा दिला. यावर काही दिवसातच आणखी काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, असा दावा विरोधकांनी केला. त्यानंतर वाझेचे अनिल परब यांच्यावर आरोप करणारे पत्र समोर आले. या पत्रानंतर जंयत पाटलांनी भाजपवर हल्लाबोल केला.
हेही वाचा -वाझे प्रकरणात आपला काडीचा संबंध नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
हेही वाचा -सीबीआय चौकशी सुरूच राहणार, अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली