मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रात येणाऱ्या आठशेहून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि त्यासोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेशाच्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. यासाठीची माहिती शिक्षण उपसंचालक मुंबईचे प्रभारी उपसंचालक राजेंद्र आहिरे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
पुढील आठवड्यापासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा पहिला टप्पा - non grant
या नोंदणीमध्ये यंदा जे नवीन महाविद्यालय सुरू होणार आहेत किंवा ज्या तुकड्यांची वाढ झालेली आहे अथवा ज्या जुन्या तुकड्या आहेत, परंतु त्यात काही शाखांचे बदल अथवा प्रवेशाच्या जागांचे बदल झालेले आहेत.
मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया मागील काही वर्षापासून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होते. यंदा या प्रवेश प्रक्रियेत अनेक सुधारणा करण्यात येत असल्याने त्यासाठीचा पहिला टप्पा १५ मेनंतर सुरू होईल, अशी माहिती अहिरे यांनी दिली. या पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी त्यांच्याकडे असलेल्या विविध शाखेचे प्रवेश तसेच विना अनुदानित महाविद्यालय असल्यास त्यांच्याकडून आकारण्यात येणारे शुल्क आदींची माहिती असलेले पुस्तिका विद्यार्थ्यांना आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी आणि त्याचा पासवर्डही दिला जाणार आहे. यामुळे लगेच पहिल्या टप्प्यासाठीची नोंदणी विद्यार्थ्यांना करता येईल, अशी माहितीही आहिरे यांनी दिली. आमच्या विभागाकडून सध्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. या नोंदणीमध्ये यंदा जे नवीन महाविद्यालय सुरू होणार आहेत किंवा ज्या तुकड्यांची वाढ झालेली आहे अथवा ज्या जुन्या तुकड्या आहेत, परंतु त्यात काही शाखांचे बदल अथवा प्रवेशाच्या जागांचे बदल झालेले आहेत. त्यासाठीची दुरुस्ती सध्या सुरू आहे. यासाठी भांडुप येथील डीएव्ही महाविद्यालयात विभागाकडून शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी या शिबिरातून सर्व प्रकाराच्या दुरुस्त्या आणि महाविद्यालयांच्या प्रवेशाची नोंदणी करून घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
मागील वर्षी आठशेहून अधिक महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी ३ लाख १ हजार ७६० जागा उपलब्ध होत्या. यंदा त्यात सुमारे ४ हजाराहून अधिक जागा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या 'मागेल त्यांना महाविद्यालयांची मान्यता देण्याच्या अलिखित धोरणामुळे मुंबई महानगर क्षेत्रात यंदा २० हून अधिक नवीन महाविद्यालये सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी जागा मुबलक असल्या तरी रिक्त राहण्याची शक्यता आहे.