मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मात्र, या कोरोनाग्रस्त रुग्णाला आधीपासूनच उच्च रक्तदाबाचा दीर्घकालीन त्रास होता. त्यानंतर त्याला न्यूमोनिया झाला होता. त्याच्या हृदयालाही सूज आली होती. तसेच हृदयाचे ठोके वाढल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितले.
हेही वाचा -'त्या' रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची खात्री केली जात आहे; आरोग्य मंत्र्यांची माहिती
दरम्यान, मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण आढळल्याने मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 7 झाली आहे. मुंबई बाहेरील 8 रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याने मुंबई परिसरातील रुग्णांची एकूण संख्या 15 झाली आहे, असे शाह यांनी सांगितले. मुंबईमधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
हेही वाचा -'सध्या रेल्वे, बस बंद नाहीत पण...'
शाह यांनी सांगितले, की हा रुग्ण 63 वर्षांचा होता. 5 मार्चला हा रुग्ण दुबई येथून प्रवास करून आला होता. पहिल्यांदा हिंदुजा रुग्णालयात तो 8 मार्चला दाखल झाला होता. यानंतर 13 मार्चला त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची प्रकृती काल (सोमवार) संध्याकाळपर्यंत सुधारत होती. मात्र, रात्रीपासून त्याची प्रकृती खालावली आणि सकाळी त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाची पत्नी आणि मुलगा यालाही कोरोनाची लागण झाली असल्याने उपचारासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार या मृत रुग्णावर पालिका आणि स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज (मंगळवारी) सायंकाळी अंतिम संस्कार करण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.
मुंबई परिसरात कोरोनाचे १५ रुग्ण -
मुंबईमध्ये कोरोनाचा आणखी एक नवा रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण 49 वर्षांचा पुरुष आहे. त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा रुग्ण अमेरिका येथे जाऊन 7 मार्चला मुंबईत परतला आहे. त्याच्या जवळच्या 11 लोकांची माहिती घेऊन अतिजवळच्या 4 जणांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळल्याने मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. तर मुंबईबाहेरील 8 रुग्ण अशा एकूण 15 रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ट्रॉमा केअरमध्ये नवीन विलगीकरण कक्ष सुरु -