मुंबई -मुंबईच्या सुप्रसिद्ध अशा फॅशन स्ट्रीट (Fashion Street Mumbai) येथील दुकानांना शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. (Fashion Street Mumbai Fire). ही घटना शनिवार (५ नोव्हेंबर)रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत ही आग विजवण्यात यश मिळवले आहे. आगीमध्ये १० ते १२ दुकाने जळून खाक झाली आहेत. स्वस्त व फॅशनेबल कपड्यांसाठी फॅशन स्ट्रीटची ओळख आहे.
फॅशन स्ट्रीट येथील दुकानांना आग लागली १२ मिनिटात विजवली आग: अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार फॅशन स्ट्रीट परिसरात लागलेली आग ही लेव्हल १ प्रकारातली आग आहे. फॅशन स्ट्रीटला आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. १ वाजून २ मिनिटांनी लागलेली आगी अग्निशमन दलाने १ वाजून १४ मिनिटांनी म्हणजेच केवळ १२ मिनिटात विजवली. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई अग्नीशमन दल आणि पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा रस्ता सध्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या आगीमध्ये झालेल्या दुकानदारांचे नुकसान मोठ्या प्रमाणात असल्याने नुकसान कशाप्रकारे भरून निघेल असा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याचे दुकानदारांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.