मुंबई - बोरिवली-पश्चिम येथील सुप्रसिद्ध असलेल्या इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरला आज (शनिवारी) पहाटे तीनच्या सुमारास आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या साडे सहा तासांपासून अग्निशमन दलाचे जवान अथक प्रयत्न करत आहेत. आगीचे लोळ तळमजल्यावरून पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचले आहे. मोठया प्रमाणात धुराचे लोळ पसरले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाने फायर रोबोची मदत घेतली आहे. फायर रोबोच्या माध्यमातून आगीवर पाण्याचा फवारा मारुन नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगीत अद्याप कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
बोरिवली पश्चिममध्ये एस. व्ही. रोड येथे इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटर आहे. या शॉपिंग सेंटरला आज (शनिवारी) पहाटे ३ वाजताच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. शॉपिंग सेंटरमध्ये आगीचा धूर मोठ्या प्रमाणात असल्याने आग विझवण्यात अडथळे निर्माण होत आहेत. सकाळी सव्वा सहाच्या सुमार ही आग लेव्हल चारची म्हणजेच भीषण असल्याचे जाहीर करण्यात आले.