मुंबई - पवईतील आयआयटी मेन गेटसमोर धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना आज (शुक्रवार) रात्री 9 च्या सुमारास घडली. आग लागल्यानंतर जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने चालक कारच्या बाहेर आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबईतील पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी येथून गांधीनगर जंक्शन येथे मारुती स्वीफ्ट (एमएच ०४ सीजे ५५२५) ही कार आयआयटी मेनगेट समोरुन जात होती. यावेळी कारच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागल्याने चालकाने रस्त्यात कार थांबवून पाहिले असता कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने चालक बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. घटनास्थळी जमलेल्या स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर, माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.