मुंबई- मलबार हिल येथील 15 मजली 'लॅसपालमास' इमारतीला बुधवारी रात्री 8 च्या सुमारास भीषण आग लागली. पाचव्या मजल्यावर लागलेल्या या आगीचा धूर क्षणात पसरल्याने रहिवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य सुरू करून इमारतीत अडकलेल्या 18 जणांची सुखरुप सुटका केली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असले, तरी या घटनेत 3 जवान जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
मलबार हिल येथील लॅसपालमास इमारतीला आग मलबार हिल येथील कमला नेहरू पार्कच्या बाजूला असलेल्या उच्चभ्रू भागात लॅसपालमास ही 15 मजली रहिवासी इमारत आहे. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाचव्या मजल्यावर लागलेल्या या आगीने रौद्ररुप धारण केले. लेव्हल २ ची आग क्षणात लेव्हल तीनची झाली. आग लागताच रहिवाशांनी इमारतीच्या बाहेर येण्यासाठी धावपळ केली.
हेही वाचा - 'या' कारणासाठी मुख्यमंत्र्यांनी केले पंतप्रधानांचे अभिनंदन
या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच, 8 फायर इंजीन, 7 जंबो टँकरसह घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्याचे कार्य हाती घेतले. यावेळी इमारतीत अडकलेल्या 18 रहिवाशांची सुटका केली असून रात्री उशीरापर्यंत आग विझण्याचे प्रयत्न सुरू होते. रात्री साडेदहा वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
तीन जवान जखमी -
आगीवर नियंत्रण मिळवताना धुरामुळे अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी झाले आहेत. आगीच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास झाल्याने गवालिया टँकच्या राहुल कौल या जवानाला जी टी रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. त्याला कृत्रिम श्वास दिला जात आहे. जितेंद्र कदम यांच्या पाठीच्या मणक्यात दुखू लागल्याने नायर रुग्णालयात नेण्यात आले आहे. तर भायखळा अग्निशमन केंद्राचे निलेश चव्हाण यांच्या उजव्या पायात सूज आणि दुखू लागल्याने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - मुंबई पालिका कार्यालयातील शौचालये महिलांना निःशुल्क वापरता येणार ; विशेष बाब म्हणून अर्थसंकल्पात निर्णय