मुंबई - मालाडमधील लागलेल्या या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यात अनेक सिलिंडरचे स्फोटदेखील झाले आहेत. लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सध्या अग्निशामन दलाकडून सुरू आहे. यात एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तसेच जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे,
जोगेश्वरीत अग्नितांडव - सोमवारी सकाळीच जोगेश्वरी भागातील एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली होती. मुंबईतील जोगेश्वरी भागातील राम मंदिराजवळ सोमवारी सकाळी 11 वाजता ही आग लागली होती. याबाबतची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या व त्यांनी आगीवर नियंत्रणही मिळवले आहे. सध्या ही आग आटोक्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीत दुकाने जळून खाक - फर्निचर मार्केटला लागलेल्या आगीत १००हून अधिक दुकाने जळून खाक झाली आहेत. लागलेल्या या आगीमागे सिलिंडरचा स्फोट झाल्याचे कारण सांगितले जात आहे. या भागात ६०० हून अधिक दुकाने आहेत. ही आग लेव्हल ३ म्हणून घोषित करण्यात आली होती.
आगीच्या घटनांमध्ये वाढ - सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. यामुळेच आगीच्या घटना आता वाढत असल्याची बाब समोर आली आहे. आग लागण्यामागील हे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी दिवसभरात मुंबईत दोन वेगवेगळ्या आगीच्या घटना घडल्या आहेत. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
भिवंडीत भीषण आग - भिवंडी शहरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून मागील आठवड्याभरात अर्ध्या डजनहून अधिक आगीच्या घटना घडलेल्या आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास दिवानशहा दर्गा रोड परिसरात एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या आगीमध्ये ५ यंत्रमाग कारखाने जळून खाक झाले आहेत. या आगीचे कारण अस्पष्ट आहे. सदर आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या होत्या.