मुंबई- लोअर परेल येथील सनमिल कंपाऊंड येथील एका बंद दुकानाला बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) रात्री आग लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले असून त्यात कोणीही जखमी नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
आगीवर नियंत्रण
लोअर परेल येथील सनमिल कंपाऊंड येथील एका बंद दुकानाला बुधवारी रात्री 10.11 वाजता आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रात्री 11.28 वाजता ही आग लेव्हल 2 ची असल्याचे घोषित करण्यात आले. 8 बंब, 8 जंबो टँकरच्या सहायाने रात्री 1.25 वाजता आग आटोक्यात आली. रात्री 2.21 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले. या आगीत कोणीही जखमी नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
साकिनाका सिलेंडर स्फोट, 3 मृत्यू -
मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर) रात्री साकिनाका येथील आनंद भुवन चाळीत गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच घरातील 6 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. बुधवारी 60 वर्षीय महिला व एका 8 वर्षीय मुलाचा सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 3 झाली आहे. इतर 3 जणांवर राजावाडी आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
हेही वाचा -मुंबईत 1 हजार 144 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 17 रुग्णांचा मृत्यू