मुंबई- चेंबूर पोलीस ठाण्यासमोर असलेल्या शुभम फ्लोरा अपार्टमेंटमधील तिसऱया माळ्यावरील दाताच्या दवाखान्यातील एसी मशीनमध्ये शाॅर्टसर्कीट झाल्यामुळे आग लागली. दुपारी 2 च्या सुमारास ही आग लागली होती. आगीत या दवाखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. आगीत कोणीही जखमी झाले नसून अग्निशामक दलाच्या पाच टँकरने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
मुंबईत आगीचे सत्र चालूच आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी मुंबईतील नागरिक एसीचा वापर करतात. काही दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील मोबाईल दुकानातील एसीमध्ये आग लागून दुकानाचे मोठे नुकसान झाले होते. एसीत सातत्याने आगी लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडत आहे.
चेंबूर नाका मोनो स्थानकाजवळील शुभम फ्लोरामध्ये व्यावसायिक गाळे आहेत. आज दुपारी दोनच्या दरम्यान तिसऱया माळ्यावरील दातांच्या दवाखान्यात एसी मशीनमध्ये शाॅर्टसर्कीट झाल्यामुळे आग लागली होती. आगीचे प्रमाण वाढत असल्याने जवळील चेंबूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दवाखाना आणि परिसरात जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. इतर माळ्यावरील नागरिक आणि रुग्ण लवकर खाली उतरले असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.