मुंबई FIR Against Aaditya Thackeray : लोअर परेल पुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एन एम जोशी पोलीस स्टेशन इथं मुंबई महापालिकेच्या पूल विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आालाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसंच लोअर परेल पुलाचं उद्घाटन आदित्य ठाकरेंना चांगलंच भोवणार असण्याची शक्यता आहे.
गेल्या जवळपास पाच वर्षापासून बहु चर्चित आणि प्रलंबित अशा लोअर परेल पुलाचे उद्घाटन सप्टेंबर महिन्यात करण्यात आलं. त्यावेळी देखील राजकीय पक्षांची चढाओढ पाहायला मिळाली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) काही वरिष्ठ नेत्यांसोबत लोअर परेल पुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्घाटन करून मार्गिका खुली केली होती. मात्र पोलिसांकडून ही मार्गीका महापालिकेच्या अर्जानंतर बंद करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल : गुरूवारी (16 नोव्हेंबर) आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून लोअर परेल रोडच्या दुसऱ्या लेनचं काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आलं होतं. या विरोधात मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये आलेली बघायला मिळतंय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाकडून याविषयीची तक्रार एन एम जोशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे अन् ठाकरे गटाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पालिकेचे दोन अधिकारी एन. एम. जोशी पोलीस स्थानकात रात्री 11 वाजेच्या सुमारास दाखल झाले. रात्री तीन वाजेपर्यंत हे अधिकारी पोलीस ठाण्यात होते. त्यानंतर आदित्य ठाकरे अन् इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, यासंदर्भात बोलत असताना पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी अशा प्रकारे कोणताही अर्ज आला नसल्याची प्रतिक्रिया ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं काय : दरम्यान, लोअर परेल पुलाची इतर कामं अपूर्ण होती. त्यामुळं साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करुन लेन सुरू करण्याचं नियोजन मुंबई महापालिकेनं केलं होतं. असं असताना अशाप्रकारे उद्घाटन करणं बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचं उद्घाटन केल्यानं नव्या वादाला सुरुवात झालीये.
हेही वाचा -
- गद्दार आमदारांनी राजीनामे द्यायला हवे होते, मात्र ते मंत्री-मुख्यमंत्री झाले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
- Aditya Thackeray : "बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष कसे शोभतात?", आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
- Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, नोटीस जारी; वाचा काय आहे प्रकरण?