मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केवळ नावाला मुख्यमंत्री असून सरकारचा कारभार फडणवीस हाकतात, अशी खोचक टीका विरोधक सातत्याने करतात. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या पाहणी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या वाहनाचे सारथ्य केल्यानंतर सत्तेची चावी फडणवीसांकडे असल्याची चर्चा रंगली होती. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील, देवेंद्र फडणवीस हेच लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियातून मुख्यमंत्री शिंदेंची खिल्ली उडवली जात आहे.
शिंदे सरकारचे स्टेरिंग भाजपच्या हाती:शिवसेनेत बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन सुरत व्हाया, गुवाहाटी आणि गोवा गाठून भाजपच्या मदतीने राज्यात सत्तेवर आले आहे. भाजपने फडणवीसांना डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना ही बाब रुचली नव्हती. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर मनावर दगड ठेवून निर्णय घेतल्याचे सांगत उघड नाराजी व्यक्त केली होती. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच मुख्यमंत्री म्हणून शिंदे केवळ नावाला असून शिंदे सरकारचे स्टेरिंग भाजपच्या हाती म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याचा आरोप होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वभावातून ते देखील सतत जाणवते.
सभागृहाला नमस्कार करण्याची परवानगी:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे समोर नेहमीच गोंधळत असल्याचे दिसतात. ३ जुलै २०२२ रोजी सरकारचा बहुमताचा ठराव मंजूर झाला. यावेळी अभिनंदनचा प्रस्ताव मांडण्यात आला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाला सुरुवात केली. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीस यांना मध्येच थांबवत. सभागृहाला नमस्कार करण्याची परवानगी मागितली होती. फडणवीसांनी होकार दिल्यानंतर, सर्वांना हात जोडून नमस्कार केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदेंवर प्रश्नाची सरबत्ती करण्यात आली. फडणवीस यांनी शिंदे यांच्या समोरील माईकवरून खेचून घेत उत्तरे दिली. सोशल मीडियावर शिंदे यांची जोरदार खिल्ली उडवण्यात आली आहे. शिवाय फडणवीस यांच्या इशाऱ्यावर शिंदे काम करणार असल्याचे मिम्स व्हायरल झाले होते.
शिंदे गटाच्या समर्थकांनी गराडा: शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री केले आहे. ७ जुलै रोजी मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदे पदभार स्वीकारला आहे. कुटुंबीय, आमदार आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी गराडा घातला होता. दरम्यान, बराच वेळ मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्याची प्रतीक्षा एकनाथ शिंदे करत होते. बाजूला सरकारचे निर्माते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना मुख्यमंत्र्याच्या पदाच्या खुर्चीत कसे बसायचे, अशी अस्वस्थता शिंदे यांच्या हालचालीवरून दिसून येत होती. फडणवीसांच्या ती लक्षात येताच, हाताला धरून शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसवले. शिवाय टेबलावरील कागदपत्रं पुढे करत स्वाक्षरी करण्याची इशारा केला आहे. मोठ्या प्रमाणात त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेवर टीका झाली होती.
मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल: मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाचे सारथ्य केले आहे. शिंदे सरकारचे स्टेरिंग फडणवीसांच्या हाती असल्याची चर्चा रंगली. सोशल मीडियातून शिंदे आणि फडणवीस यांचे मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. हे प्रकरण ताजे असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाच्या उद्घाटनात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख करत विरोधकांचे म्हणणे सत्यच असल्याचे दाखवून दिले आहे. सध्या मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात आहे.