मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने याठिकाणी लॉकडाऊनचे पालन योग्यपणे झाले पाहिजे, असे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी पोलीस प्रशासनाला दिले. कोरोना बाधितांच्या नजिकच्या संपर्कात येणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून संस्थात्मक अलगीकरण सुविधेमध्ये दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी पालिका आणि आरोग्य प्रशासनाला दिले.
इकबाल चहल यांनी पालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच नायर रुग्णालयानंतर जी/उत्तर विभागातील धारावी येथील मुकुंद नगर व शास्त्री नगर या परिसरांमध्ये भेट दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी संपूर्ण तपशील आयुक्तांसमोर सादर केला. धारावीमध्ये झोपडपट्टी व दाट वस्ती असलेल्या भागात प्रतिबंधित क्षेत्राजवळ जाऊन प्रत्यक्ष नागरिकांशी चहल यांनी संवाद साधला. सार्वजनिक शौचालयांची पाहणी केल्यानंतर तेथील व्यवस्था सांभाळणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींना आयुक्तांनी निर्देश दिले. शौचालयांची नियमित सफाई, निर्जंतुकीकरण योग्यरित्या झाले पाहिजे, पुरेसे हँडवॉश उपलब्ध असावेत, अशा सूचना केल्या. मुकुंद नगरात प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी करत असताना लॉकडाऊनचे पालन योग्यपणे झाले पाहिजे, यासाठी उपस्थित पोलिसांनाही आयुक्तांनी निर्देश दिले.