मुंबई:समीरा मोहम्मद वसीम खान आणि सुभाष रामचंद्र पातरा हे दोघेही साकिनाका परिसरात राहतात. त्यांना भाड्याने रुमची गरज असल्याने त्यांनी परिसरातील इस्टेट एजंटला सांगितले होते. या एजंटने त्यांची ओळख फरीदा, तिचा पती अस्लम, मुलगा आसिफ आणि फैजानशी करून दिली होती. त्यांनी त्यांचा कुर्ला येथे एक रुम आहे. पैशांची गरज असल्याने त्यांना तो रुम हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे, असे सांगितले होते. या दोघांनी तो रुम पाहिला होता. रुम पसंद पडल्यानंतर त्यांनी तो रुम भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या चौघांनी समीराकडून साडेचार ते सुभाषकडून चार लाख रुपये हेव्ही डिपॉझिट म्हणून घेतले. मात्र रुमचा करार आणि रजिस्ट्रेशन होऊनही रुमचा ताबा दिला नाही.
पोलिसात तक्रार: चौकशीनंतर त्यांना तो रुम त्यांनी दुसर्या महिलेला विक्री करून तेथून पलायन केल्याचे समजले होते. या दोघांसह इतर काही लोकांना भाड्याने रुम द्यायचा आहे असे सांगून त्यांच्याकडूनही त्यांनी हेव्ही डिपॉझिट म्हणून पैसे घेतले होते. या सर्वांची फसवणूक केल्यानंतर ते चौघेही पळून गेले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी चारही आरोपींविरुद्ध साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती.
एका आरोपीचा शोध सुरू: या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद करून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असतानाच यातील एका गुन्ह्यांत फरीदाला तर दुसर्या गुन्ह्यांत तिचा पती अस्लम आणि मुलगा आसिफ या दोघांना पोलिसांनी अटक केली. तिनही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत. फैजान हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.