मुंबई :आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॅगच्या अहवालानुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीकडे सात विभागांच्या चौकशीचा अहवाल पाठवायचा आहे. एसआयटीने पाच विभागांची चौकशी वेगवान सुरू केली आहे. तीन प्राथमिक चौकशी प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. रस्ते, पूल, स्ट्रॉम वॉटर तांत्रिक विभाग (आयटी) या चार विभागांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चार मुख्य अभियंता आणि आयटी विभागाचे संचालक यांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात करण्यात आली आहे.
'या' पाच अधिकाऱ्यांची चौकशी :महापालिकेच्या रस्ते विभागाचे मुख्य अभियंता मनीष कुमार पटेल, आयटी विभागाचे संचालक शरद उघडे, सांडपाणी विभागाचे मुख्य अभियंता अशोक मुंग्रे, स्ट्रॉम वॉटर विभागाचे मुख्य अभियंता आशिष जागिंदर आणि पूल (ब्रिजेस) विभागाचे मुख्य अभियंता संजय कोंडालेपुरे या पाच अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात एसआयटीने चौकशी केली आहे. सूत्रांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आर्थिक गुन्हे शाखेचे एसआयटी पथक गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी तपास करत आहे. महापालिका मुख्यालयात जाऊन टीमने तपास सुरू केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार हे देखील स्वतः तीनदा या प्रकरणी चौकशीसाठी महापालिका मुख्यालयात गेले असल्याची माहिती मिळत आहे.
संबंधित कागदपत्रे एसआयटीच्या अधिकाऱ्याकडे जमा:मुंबईतील 12 हजार कोटीच्या घोटाळ्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेची एसआयटी (SIT) स्थापन झाल्यानंतर अनेकदा महापालिका मुख्यालयात एसआयटीच्या पथकाने चौकशी केली आहे. 2011 ते 2019 या दरम्यान झालेल्या संबंधित विभागातील आर्थिक अनियमितते बाबत ही चौकशी होत आहे. या प्रकरणातील संबंधित कागदपत्रे एसआयटीच्या अधिकाऱ्याने जमा केली आहेत.
कॅगच्या अहवालात अनियमितता उघड :कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या कारभाराबाबत कॅगचा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आला होता. या अहवालात मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील कारभारामध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. यानंतर भाजपाकडून या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती.