महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mayors Fund : महापौर निधीमधून आर्थिक मदतीसाठी शेकडो अर्ज पडले धूळखात - Mumbai Municipal Corporation in mumbai

मुंबईमधील गरीब आणि गरजू रुग्णांना मुंबई महापालिकेच्या महापौर निधीमधून ( Mayors Fund ) आर्थिक मदत केली जाते. मार्चमध्ये कार्यकाळ संपल्याने महापालिका बरखास्त करण्यात ( municipality was dissolved ) आली आहे. पालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने महापौर पदावर कोणीही लोकप्रतिनिधी नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे.

BMC
महापौर निधीमधून आर्थिक मदतीसाठी शेकडो अर्ज

By

Published : Nov 14, 2022, 10:27 AM IST

मुंबई : मुंबईमधील गरीब आणि गरजू रुग्णांना मुंबई महापालिकेच्या महापौर निधीमधून ( Mayors Fund ) आर्थिक मदत केली जाते. मार्चमध्ये कार्यकाळ संपल्याने महापालिका बरखास्त करण्यात ( municipality was dissolved ) आली आहे. यामुळे गरीब व गरजू रुग्णांच्या २०० हुन अधिक नातेवाईकांनी मदतीसाठी अर्ज करून सुद्धा त्यांना या निधीमधून आर्थिक मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे पालिकेकडे यासाठी निधी आहे. मात्र पालिकेच्या निवडणुका झाल्या नसल्याने महापौर पदावर कोणीही लोकप्रतिनिधी नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. यामुळे पालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन गरीब गरजू नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली जात आहे.


महापौर निधी मधून रुग्णांना मदत :रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यावर खर्च आवाक्याबाहेर गेल्यावर इतर ठिकाणाहून आर्थिक मदत मिळवण्यासाठी नातेवाईक प्रयत्न करतात. त्यासाठी ते विविध संस्था, ट्रस्ट, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच मुंबई महापालिकेच्या महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करतात. महापौर निधीमधून २०११ पासून रुग्णांना प्रत्येकी ५ हजार रुपये आर्थिक मदत दिली जात होती. महापौर निधीमधून देण्यात आलेले ५ हजार रुपयांचे धनादेश अनेक रुग्णालये स्वीकारत नव्हती. यामुळे २०१९ मध्ये विश्वनाथ महाडेश्वर महापौर असताना त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ हजार रुपयांच्या मदतीत वाढ करून १५ हजार रुपये रुग्णांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्दय शस्‍त्रक्रिया तसेच किडणी रोपण या आजारांच्‍या रुग्‍णांना प्रत्‍येकी २५ हजार तर डायलेसीसच्‍या रुग्‍णांकरिता १५ हजार रुपये आ‍र्थि‍क मदत करण्‍याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिकेच्या महापौर निधीला दानशूर व्यक्तींकडून मदत दिली जाते त्याच्या व्याजामधून रुग्णांना ही आर्थिक मदत केली जाते अशी माहिती पालिकेची चिटणीस विभागाकडून देण्यात आली आहे.


महापौर निधी वाढवण्यासाठी प्रयत्न :महापौर निधीच्या रकमेत वाढ करावी यासाठी मुंबईमधील खासदार, आमदार, नगरसेवकांनी आपल्या एक महिन्याचे मानधन महापौर निधीसाठी द्यावे असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले होते. असेच आवाहन त्यानंतरच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपले दरमहा मिळणारे २५ हजार मानधन या निधीला दिले होते. सध्या महापौर निधीमध्ये २ कोटी रुपये फिक्स डिपॉझिटमध्ये जमा आहेत. त्यावर दरवर्षी सुमारे ५ ते ६ लाख रुपये व्याज मिळते. आतापर्यंत १३ लाख १० हजार २३० रुपये इतके व्याज जमा आहे. महापौर निधीमध्ये जमा रकमेवर मिळणाऱ्या व्याजामधून गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक मदत केली जाते. यंदा पालिका अस्तित्वात नसल्याने हा निधी पडून आहे मात्र त्यामधून कोणालाही मदत करण्यात आलेली नाही.


२०० हुन अधिक अर्ज धूळखात पडले : मुंबई महापालिकेच्या महापौर निधीमधून आर्थिक मदत मिळावी म्हणून २०० हुन अधिक रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केले आहेत. यापैकी कोणालाही आर्थिक मदत करण्यात आलेली नाही. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर महापौरांची निवड होईल त्यानंतर महापौर निधी संदर्भात बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीच्या वेळी ज्यांचे ऑपरेशन त्यावेळी होणार असेल अशा लोकांनाच मदत केली जाईल. ज्यांचे ऑपरेशन होऊन गेले आहेत त्यांचे अर्ज बाद होतील. त्यांना आर्थिक मदत मिळणार नाही अशी माहितीही चिटणीस विभागाकडून देण्यात आली आहे.


प्रशासकांनी निर्णय घ्यावा : महापौर सहाय्यता निधी गरीब आणि गरजू नागरिकांना दिला जातो. सध्या पालिका बरखास्त केल्याने सर्व निर्णय महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून घेत आहेत. आयुक्त टेंडर आणि प्रस्ताव मंजूर करत आहेत. आयुक्त केवळ टेंडर आणि प्रस्ताव मंजूर करायला नाहीत. ते सध्या प्रशासक असल्याने त्यांनी शहरातील गरीब आणि गरजू नागरिकांबाबत चांगला विचार करायला हवा. गरीब गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यायला हवा अशी प्रतिक्रिया मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details