मुंबई - कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील अंतिम वर्षांच्याच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तर उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याविषयी अनेक प्रकारच्या तक्रारी आल्याने यावर फेरविचार केला जाणार आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, राज्यातील अकृषी विद्यापीठातील कुलगुरू आणि संबंधित अधिकाऱ्यांची एक आढावा बैठक २० जून रोजी घेतली जाणार आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि संलग्न असलेल्या महाविद्यालयातील ३२ लाख विद्यार्थ्यांपैकी २५ लाख विद्यार्थ्यांच्या यावर्षीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार असून या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे ७ ते ८ लाख इतकी आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत २० जून रोजी आढावा घेण्यात येईल. यावेळी फेरविचार करु पण आता अभ्यास करा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
उदय सामंत यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून जोपर्यंत कोणतीही स्पष्ट सूचना येत नाही तोपर्यंत या विद्यार्थ्यांनी परीक्षा आहेत, असे समजूनच घरी राहून शांतपणे अभ्यास करावा. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागतील हे यूजीसीचे म्हणणे आहे, असे सावंत म्हणाले. कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुन्हा एकदा समितीची बैठक होणार आहे. यावेळी आढावा होणार आहे.