मुंबई -सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी दिलेल्या निर्देशानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने आज (दि. 30 ऑगस्ट) आपला अहवाल तयार केला. त्या अहवालावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांचे पर्याय आणि त्यासाठी असलेल्या अडचणी काय आहेत. याविषयीचे वास्तव अहवालातून समोर आल्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा झाली. हा अहवाल उद्या (दि. 31 ऑगस्ट) सरकारकडे सादर केला जाणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. तसेच राज्यपालसोबतही याविषयी चर्चा तातडीने केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती काल (शनिवार) गठीत करण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या अहवालावर आज (रविवार) ही बैठक पार पडली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कुलगुरूंच्या समितीच्या सदस्यांसोबतच माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर तसेच माजी कुलगुरू डॉ. विजय खोले आदी निमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित होते. या बैठकीत डॉ. खोले आणि डॉ. वेळूकर यांनी अनेक प्रकारच्या सूचना केल्याने कुलगुरू समितीचा अहवाल हा उद्या (सोमवार) सरकारकडे सादर केला जाणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी कुलगुरू समितीची बैठक संपली, उद्या सरकारला सादर करणार अहवाल - परीक्षा बातमी
सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी दिलेल्या निर्देशानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने आज आपला अहवाल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांकडे सादर केला आहे. हे अहवाल उद्या (31 ऑगस्ट) सराकारकडे सादर केला जाईल त्यानंतर राज्यपालांसह चर्चा करण्यात येईल, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी कुलगुरूंच्या समितीने तयार केलेला अहवाल उद्या दुपारी बारा वाजता सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर या अहवालावर राज्यपालांसोबत चर्चा केली जाणार आहे.
राज्यातील कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वच विद्यापीठांनी ऑफलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे मत या अहवालात नोंदविले आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि पुणे या दोन विद्यापीठांचा अपवाद वगळता राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नाही. त्यासाठीची यंत्रणा विद्यापीठांमध्ये उपलब्ध नाही. यामुळे अनेक अडचणींना सर्व विद्यापीठांना सामोरे जावे लागेल, अशा प्रकारची भीती कुलगुरूंनी या अहवालाच्या माध्यमातून व्यक्त केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मागील काही महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे याठिकाणी ऑफलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे कुलगुरूंनी या अहवालात नमूद केले आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानेच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले असल्याने या परीक्षा कोणत्या परीस्थितीत घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे या परीक्षेसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखून त्या परीक्षा कशा घेता येतील यासाठीच्या अनेक शिफारशी कुलगुरूंच्या समितीने आपल्या अहवालात केल्या आहेत, अशी माहितीही देण्यात आली.
हेही वाचा -रिया चक्रवर्ती तिसऱ्या दिवशीही सीबीआयसमोर चौकशीला हजर