मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा आम्हाला महत्त्वाची आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्ही राज्यात पदवी, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाची कोणतीही परीक्षा घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाला मी पत्र लिहिले असून आयोगाकडे त्या पत्रात या सर्व विद्यार्थ्यांना ग्रेडिंग पद्धतीने उत्तीर्ण करण्याची मार्गदर्शक सूचना जारी करावी, अशी विनंती केली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. आज त्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.
उदय सामंत यांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळावा यासाठीचा हा आपला निर्णय जाहीर केला असून त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये विद्यार्थी हितापेक्षा आम्हाला दुसरा कोणताही ही विषय महत्त्वाचा नसल्याचेही स्पष्ट केले. यूजीसीकडे पत्र लिहून तशा प्रकारची मागणी केली आहे. मात्र, त्यानंतरही काही निर्णय झाला नाही, तर आम्हाला राज्य सरकार म्हणून एक वेगळी ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि त्याला सर्व मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सामंत म्हणाले की, सरकार राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि त्यांच्या सुरक्षेचा विचार करत आहे. त्यामुळेच आम्ही राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार नाही. यूजीसीकडून आम्हाला काय निर्णय येतोय ते पाहायचे आहे. आम्ही सरकार आणि आमच्या विभागातील सर्व उच्चस्तरीय अधिकारी मिळून बैठक घेऊ. त्यानंतर काही कुलगुरूंची चर्चा करून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना ग्रेडिंग पद्धतीने काही गुण देता येतील का? यावर दोन दिवसात निर्णय घेऊ, असे सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी आम्हाला प्रसंगी कठोर निर्णय घ्यावा लागला, तरी आम्ही घेण्याची तयारी ठेवली आहे. गरज पडल्यास राज्य शासन यासाठीचा निर्णय सुद्धा जाहीर करेल, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
सीईटीच्या परीक्षा होणार - उदय सामंत