महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइनच, काही ठिकाणी अडचणी आल्यास पर्याय अवलंबू - उदय सामंत - final year exams online

मुंबई विद्यापीठात आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर परीक्षेसंदर्भात एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबई विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षेला १ लाख ७५ हजार विद्यार्थी बसणार आहेत. तर, यामध्ये ७२ हजार विद्यार्थी एटीकेटीच्या संदर्भातील आहेत. या एटीकेटीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २५ सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे.

उदय सामंत
उदय सामंत

By

Published : Sep 17, 2020, 7:18 PM IST

मुंबई - राज्यातील विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी विद्यापीठांची तयारी झालेली आहे. राज्यभरातील विद्यापीठ आणि परीक्षांच्या तयारीचा आढावा आम्ही घेत आहोत. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइनच घेतल्या जातील, मात्र काही ठिकाणी अडचणी आल्यास त्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब केला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना काळात होत असलेल्या परीक्षा आणि त्यांनतर विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणपत्रिकांवर कोणत्याही प्रकारे कोविडचा उल्लेख नसेल. जर कोण्या विद्यापीठाने तसा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उदय सामंत यांनी दिला. अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात आपण राज्यभरातील विद्यापीठांचा आढावा घेत असून यामध्ये विविध विद्यापीठांमध्ये यासंदर्भातील तयारी आणि त्यांच्या अडचणीची माहिती मी घेत आहे. मुंबई विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठाने या परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली असून त्यांच्या एटीकेटीच्या सर्व परीक्षा २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. तर, नियमित विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.

मुंबई विद्यापीठात आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर परीक्षेसंदर्भात एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की मुंबई विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षेला १ लाख ७५ हजार विद्यार्थी बसणार आहेत. तर, यामध्ये ७२ हजार विद्यार्थी एटीकेटीच्या संदर्भातील आहेत. या एटीकेटीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २५ सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. तर नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू केली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात अजूनही अनेक विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाइन अर्ज भरलेला नाही. या विद्यार्थ्यांना पुढील ३ दिवस अर्ज करण्याची मुभा दिली जाणार असून त्यांनी आपला ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन करत राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी बहुपर्यायी प्रश्नपत्रिका (एमसीक्यू) विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. मात्र, यातही काही विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अडचणी आल्यास त्या विद्यार्थ्यांसाठी विविध पर्याय देऊन त्यांची परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. तसेच, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही यासाठीची काळजी घेतली जाणार असल्याचे देखील सामंत यांनी सांगितले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका प्रतिनिधीने काल दिलेल्या धमकी संदर्भात सामंत म्हणाले, तो एका विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधी होता. आणि त्यांनी आमच्या पीएच्या फोनवर धमकी दिली होती. मात्र, त्यानंतर आता त्याच्यावर काय कारवाई झाली याची माहिती घेतली नाही, असा खुलासा करत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आहे. त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ज्यांना राजकारण करायचे त्यांनी करावे. याबद्दल मला काही बोलायचे नसल्याचे सामंत म्हणाले.

हेही वाचा-'पोलीस भरती करताना मराठा समाजाला १३ टक्के जागा रिक्त ठेवू'

ABOUT THE AUTHOR

...view details